भारतात क्रिकेट म्हणजे एक सणच... त्यामुळे क्रिकेटपटूंची पूजा हे काही नवीन नाही... कपिल देव ते सचिन तेंडुलकर आणि आता महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आदी क्रिकेटपटूंची फॉलोअर्स संख्या ही वाढतेच आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंवर सतत फॉलोअर्स, मीडिया, कॅमेरा यांचे लक्ष असतेच. ते काय करतात, ते कुठे जातात याची चर्चा सतत होते आणि या सर्वांचा सामना क्रिकेटपटूंच्या पत्नींनाही करावा लागतो. भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची पत्नी साक्षी धोनी ( Sakshi Dhoni) हीनं या मुद्यावर तिचे परखड मत व्यक्त केले.
महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना साक्षी अनेकदा स्टेडियमवर दिसली आहे. क्रिकेटपटूची पत्नी आणि अन्य प्रोफेशन असलेल्याची पत्नी यांच्यातील फरक साक्षीने समजावून सांगितला. पती तणावमुक्त राहावेत यासाठी महिलांना किती जुळवून घ्यावे लागेल यावर साक्षीने प्रकाश टाकला. ''आम्हाला त्यांचा अभिमान आहे, कारण ते जिथे आहेत तिथे त्यांना कोट्यवधी लोकांमधून निवडले गेले आहे आणि ते भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाचा भाग आहेत,''असे साक्षीने चेन्नई सुपर किंग्सच्या व्हिडीओत सांगितले आहे.
"जेव्हा तुमचं लग्न होतं आणि तुमचा नवरा ऑफिसला जातो तेव्हा तुमचं नियमित आयुष्य बदलतं. पण आमचे नवरे क्रिकेट खेळायला जातात. त्यामुळे मला वाटतं, त्यांना आम्ही कशा असायला हव्यात यानुसार आम्हाला स्वतःत बदल करावा लागतो," असं साक्षी पुढे म्हणाली.
पाहा व्हिडीओ..
सेलिब्रेटिची पत्नी असणं म्हणजे तुमचं खाजगी आयुष्य गमावण्यासारखं आहे. तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाता, तेव्हा पूर्वीसारखं आयुष्य जगता येत नाही, असे साक्षीने मान्य केले. ती म्हणाली, ''तुमच्याकडे तुमचं खाजगी आयुष्य राहत नाही आणि तुम्ही कॅमेऱ्यांसमोर जसे आहात तसे राहू शकत नाही. काही लोकांना कॅमेराची सवय असते, तर काहींना नसते. विशेषतः जेव्हा तुम्ही क्रिकेटपटूची पत्नी असाल तर लोकं तुम्हाला जज करतात. तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलात तरीही त्याची चर्चा होते."