Rishabh Pant Overweight : यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याची भारतीय संघाचा कर्णधारपदी निवड झाल्यानंतर त्याच्या फिटनेसची चर्चा अधिक होऊ लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभला फार काही कमाल दाखवता आलेली नाही. फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळूनही रिषभ या मालिकेत त्याच चुका करून माघारी परतताना दिसला. धावांचा दुष्काळ अन् त्यात बाद होण्याच्या पद्धतीत सातत्य यामुळे त्याच्यावर टीका होताना दिसतेय. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया ( Danish Kaneria) यानेही या टीकेत उडी घेतली आहे आणि रिषभच्या फिटनेसवर मोठं वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८२ धावांनी विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. या सामन्याचे विश्लेषण करताना कानेरियाने रिषभच्या फिटनेवर विधान केले. वाढलेल्या वजनामुळे रिषभ पंतला जलदगती गोलंदाजांच्या वेळेस यष्टीरक्षण करताना अडचण होत असल्याचे कानेरियाने नमुद केले. तो म्हणाला,''जेव्हा जलदगती गोलंदाज गोलंदाजी करतो, तेव्हा रिषभ पंत त्याच्या टाचेवर उभा राहत नाही. कदाचित त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्याला तसे करता येत नाही आणि त्यामुळे त्याच्या शरीराची चपळाईने हालचाल होत नाही. त्याची तंदुरुस्ती ही चिंतेची बाब आहे. तो १०० टक्के तंदुरुस्त आहे का?, परंतु जेव्हा त्याच्या कर्णधाराचा विषय येतो तेव्हा हार्दिक व कार्तिक यांच्यासह गोलंदाज व फलंदाजांकडून त्याला चांगली साथ मिळतेय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याची संधी त्याच्याकडे आहे.''
कानेरियाने यावेळी हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांच्या भागीदारीचे कौतुक केले. चौत्या सामन्यात कार्तिकने पहिले ट्वेंटी-२० अर्धशतक झळकावले, तर हार्दिकने ४६ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३३ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने १७० धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ ९ बाद ८७ ( कर्णधार टेम्बा बवुमा रिटायर्ड हर्ट) धावा करू शकला. ''भारतीय संघ संघर्ष करत होता आणि त्यावेळी हार्दिक व कार्तिक यांनी डाव सावरला. कार्तिकला स्वीप फटके मारणे आणि पदलालित्य दाखवणे आवडते. सर्वकाही त्याच्या मनासारखं झालं. तो DK चा दिवस होता. त्याच्या फलंदाजीच प्रगल्भता दिसली. हार्दिकनेही जबाबदारीने खेळ केला,''असे कानेरिया म्हणाला.