नवी दिल्ली : वेगवान गोलंदाजांची सध्या असलेली चौकडी पुढील दोन वर्षे आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर राहू शकते, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले.
संघाचे प्रशिक्षक व निवड समितीला मात्र या गोलंदाजांचा पर्याय शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. पुढील ९ कसोटी सामने (आॅस्ट्रेलिया दौऱ्यात चार आणि इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेतील पाच) या चौकडीसाठी एकत्र अखेरच्या कसोटी मालिका ठरू शकतात. या चारपैकी केवळ २६ वर्षीय बुमराह आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आहे. अरुण म्हणाले, ‘सध्याच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. मला तरी किमान पुढील दोन वर्षे या चौकडीबाबत कुठली समस्या दिसत नाही.’
भारतात अनेक युवा वेगवान गोलंदाज उदयास येत असल्याचे सांगत अरुण म्हणाले, ‘वेगवान गोलंदाजांची भविष्यातील पिढी तयार होत आहे. त्यांची ओळख करून घेण्यासाठी निवड समिती व प्रशिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज राहील. त्यामुळे बेंच स्ट्रेंथ तयार करता येईल. सध्याच्या गोलंदाजांना विश्रांती देत त्यांची कारकीर्द लांबविण्यासाठी बेंच स्ट्रेंथ निर्माण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत अरुण म्हणाले, ‘त्यामुळे रोटेशन नीती आणि गोलंदाजांचे वर्कलोड सांभाळण्यास मदत होईल.
आपले प्रमुख वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या मालिकेसाठी तयार असायला हवेत, असे आपल्याला वाटते.’ अरुण म्हणाले, ‘लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळी सराव शिबिर सुरू होईल त्यावेळी या अव्वल गोलंदाजांसह स्थानिक लढतींमध्ये चांगली कामगिरी करणारे व भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनाही संधी मिळायला हवी.
मी सर्व करारबद्ध वेगवान गोलंदाजांना शिबिरात ठेवण्यास उत्सुक राहीन. त्यातील काही उदयोन्मुख गोलंदाजही (वेगवान व फिरकीपटू) आहेत ज्यांनी स्थानिक क्रिकेटसोबत भारत ‘अ’ संघातर्फे चांगली कामगिरी केली आहे.’ या शिबिरात खेळाडूंना थुंकीचा वापर टाळण्याची सवय लावण्याची चांगली संधी मिळेल. थुंकीच्या वापराची सवय मोडणे कठीण काम आहे. आम्ही आपल्या सराव सत्रादरम्यान ही सवय मोडण्याचा पूर्ण प्रयत्न करू.’ (वृत्तसंस्था)