- ललित झांबरेआयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंसोबतच वर्षातील सर्वोत्तम वन डे आणि सर्वोत्तम कसोटी संघसुध्दा जाहीर करण्यात येतात. या संघांच्याबाबतीत भारताच्या दृष्टीने एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे जिचा इतर कुणालाही नक्कीच हेवा वाटेल.
काय आहे ही हेवा वाटण्याजोगी बाब तर...गेल्या दशकभरात आयसीसीने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंच्या वन डे संघाचे कर्णधारपद तब्बल दशकभर (केवळ एक अपवाद) भारतीय खेळाडूकडेच आहे. म्हणजे आयसीसीच्या वन डे टीम ऑफ दी इयरचे नेतृत्व दशकभर भारताकडेच आहे.
2011, 12, 13 आणि 14 मध्ये या संघाचा कर्णधार म्हणून आयसीसीने महेंद्रसिंग धोनीची निवड केली तर 2016, 17, 18 आणि 2019 साठी हा मान विराट कोहलीला मिळालाय. म्हणजे एक 2015 चा अपवाद सोडला तर गेल्या दशकभरात आयसीसीच्या वन डे संघाचे नेतृत्व भारताकडेच आहे.
आता 2015 मध्ये धोनीही नाही आणि विराटही कर्णधार नाही तर कर्णधार होता तरी कोण याची उत्सुकता असेल तर त्यावर्षी आयसीसीने कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू ए.बी.डीविलियर्स याची निवड केली होती. डीविलीयर्सच्या त्या संघात केवळ मोहम्मद शमी हाच एक भारतीय खेळाडू होता. मात्र त्यानंतर आता सलग चार वर्ष विराट कोहलीचीच कर्णधार म्हणून निवड होतेय. मात्र अजुनही धोनी त्याच्या पुढे आहे. आयसीसीच्या वन डे संघाचा धोनी पाच वर्षे कर्णधार होता. 2009, 11,12,13 आणि 14 मध्ये त्याला हा मान होता.