लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने काही दिवसांपूर्वी रस्त्यावर केलेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. एका वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर हा प्रसिध्द झाल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) गुरुवारी त्याला निलंबित केले. विशेष म्हणजे त्या घटनेप्रसंगी स्टोक्ससह असलेल्या अॅलेक्स हेल्स याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर ईसीबीने म्हटले की, ‘दोन्ही खेळाडू पूर्ण वेतनावर कायम राहतील आणि शिस्तपालन समितीच्या निर्णयानंतरच काही निर्णय घेण्यात येतील. तसेच, यादरम्यान या दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निवड होणार नाही.’
हातात बाटली असलेल्या दोन लोकांसोबत स्टोक्स हाणामारी करताना व्हिडिओत दिसत आहे. मारहाणीदरम्यान स्टोक्सच्या हाताला जखम झाली होती. तरीही ज्यो रुटच्या नेतृत्वात अॅशेस मालिकेसाठी निवडलेल्या १६ सदस्यीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी स्टोक्सकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, आता या निर्णयानंतर तूर्तास तरी स्टोक्स व हेल्स अॅशेस मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने(ईसीबी) दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ फुटेज काल रात्री पहिल्यांदा तपासण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. उपलब्ध पुराव्यांची सत्यता पडताळल्यानंतर ठोस कारवाई केली जाईल. बेन स्टोक्सला सोमवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याची सुटका झाली.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Ben Stokes and Alex Hells suspended, 'ECB' crackdown, threatens participation in Ashes series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.