नवी दिल्ली : 1 डिसेंबरपासून पाकिस्तानच्या धरतीवर इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा कसोटी संघ आगामी मालिकेसाठी रविवारी पहाटे इस्लामाबादला पोहोचला, जिथे त्यांना बाबर आझमच्या पाकिस्तान संघाशी सामना करायचा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या तयारीसाठी इंग्लंडच्या कसोटी संघाने अबुधाबीमध्ये वेळ घालवला होता.
दरम्यान, इंग्लंडचा संघ तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळणार आहे. त्यांनी २००५ मध्ये पाकिस्तानमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली आणि तीन सामन्यांची मालिका २-० ने गमावली. इंग्लंडने या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येथे सात सामन्यांची टी-२० मालिका खेळली आणि ४-३ ने विजय मिळवून यजमान संघाला पराभवाची धूळ चारली.
बेन स्टोक्सचा मोठा निर्णयखरं तर आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची धुरा बेन स्टोक्सच्या खांद्यावर असणार आहे. मालिकेला सुरूवात होण्याआधीच बेन स्टोक्सने एक भावनिक निर्णय घेऊन सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याने याबाबत माहिती देताना म्हटले, "पाकिस्तानात पहिल्यांदाच ऐतिहासिक मालिकेसाठी आलो आहे याचा आनंद आहे. तब्बल १७ वर्षांनंतर होत असलेल्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. पाकिस्तानात या वर्षी पूर परिस्थितीमुळे खूप नुकसान झाले, याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे. खेळाने मला माझ्या आयुष्यात खूप काही दिले आहे पण मला असे वाटते की क्रिकेटच्या पलीकडे काहीतरी परत देण्याचा मला अधिकार आहे. म्हणून मी माझ्या कसोटी मालिकेतील मॅच फी पाकिस्तानातील पूरग्रस्थांना दान करणार आहे. मला आशा आहे की ही रक्कम पाकिस्तानातील पूरग्रस्तांपर्यंत पोहचेल.
३ सामन्यांचा रंगणार थरार पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या चक्राचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे १ ते ५ डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे ९ ते १३ डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे १७ ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हे तीन कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रातील इंग्लंडचे शेवटचे सामने असतील.
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबरार अहमद, अझहर अली, फहीम अशरफ, हारिस रौफ, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शान मसूद आणि झाहिद महमूद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"