Ben Stokes Silver Cap, ENG vs WI Test: इंग्लंड संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यातील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. यादरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सला 'सिल्व्हर कॅप' म्हणजेच चांदीची टोपी देऊन सन्मानित केले. स्टोक्सची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने इंग्लंडसाठी अनेक मोठे पराक्रम केले आहेत. इंग्लंड संघाला २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ मध्ये टी२० विश्वचषक जिंकण्यात मदत करण्यात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. आता तो इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 'बॅझबॉल' फॉर्म्युला प्रभावीपणे राबवला आणि यामुळे संघाला मोठे यशही मिळाले. कसोटीत १०० सामने खेळून बेन स्टोक्सने अनोखे शतक झळकावले. त्यामुळेच ईसीबी (ECB) ने त्याला सिल्व्हर कॅप देऊन त्याचा गौरव केला.
१०० कसोटी सामने खेळणे ही कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठी गोष्ट असते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ ८० क्रिकेटपटूंना शंभराहून अधिक कसोटी सामने खेळता आले आहेत. यामध्ये १७ खेळाडू इंग्लंड संघाचे आहेत. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत १०० सामने खेळण्याचा पराक्रम गाजवला आहे. राजकोट येथे झालेल्या ५ सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने हे यश मिळवले. आता या पराक्रमासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लॉर्ड्सवर त्याला सिल्व्हर कॅप देऊन सन्मानित केले.
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या कसोटीत विंडिजचा पहिला डाव १२१ धावांत आटोपला. त्यात बेन स्टोक्सने केवळ १ विकेट घेतली. तर इंग्लंडच्या पहिल्या डावात तो केवळ ४ धावांवर बाद झाला.