ben stokes ipl 2023 । नवी दिल्ली : बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाने मागील अनेक महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी केली आहे. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 11 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि आता संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे जिथे पाहुण्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात किवी संघाचा पराभव केला आहे. कसोटी क्रिकेटनंतर, बेन स्टोक्स आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसणार आहे. परंतु त्याने स्पष्ट केले आहे की, तो आयपीएलच्या काही सामन्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. कारण इंग्लंडच्या संघाला आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी करायची आहे.
दरम्यान, मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सवर मोठी बोली लावली आणि त्याला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल लिलावादरम्यान बेन स्टोक्स पाकिस्तानमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व करत होता आणि एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याने आपला उत्साह सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवला होता. आयपीएलचे वेळापत्रक मागील आठवड्यात जाहीर झाले असून स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे आणि त्याच्या 4 दिवसांनंतर लगेच आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना होणार आहे.
बेन स्टोक्सचे सूचक विधान
आयर्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात भाग घेणार का असे विचारले असता स्टोक्सने म्हटले, "हो, मी नक्कीच खेळेन. मी वेळेवर येण्याची आणि या सामन्यासाठी तयार राहण्याची खात्री देत आहे. ॲशेस मालिकेच्या तयारीसाठी काय करायला हवे याबद्दल मी माझ्या सहकारी खेळाडूंशीही बोललो आहे. कारण ते 5 सामने आमच्यासाठी खूप मोठे आहेत आणि जर आम्ही आयर्लंडकडून सामना हरलो तर आम्हाला ॲशेसमध्ये पराभवासह जायला आवडणार नाही. त्यामुळे आयर्लंडचा कसोटी सामनाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एकूणच बेन स्टोक्सने अप्रत्यक्षपणे आयपीएलमधून लवकर बाहेर पडण्याबाबत म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ben Stokes is likely to pull out of the IPL 2023 midway for the Test match against Ireland
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.