ओव्हल - बेन स्टोक्सने बुधवारी केन्सिंग्टन ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १२४ चेंडूंत १८२ धावांची खेळी केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला. इंग्लंडने ४८.१ षटकांत ३६८ धावा केल्यानंतर न्यूझीलंडला १८७ धावांत गुंडाळून १८१ धावांनी मोठा विजय साजरा केला. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.
या ऐतिहासिक खेळीनंतर बेन स्टोक्सने आकाशाकडे पाहताच बोटे दुमडून आपल्या ट्रेडमार्क शैलीत आनंद साजरा केला. खरं तर हे करून त्याला त्याच्या वडिलांची आठवण होते. ते आता हयात नाहीत. बेन स्टोक्सने डाव्या हाताचे मधले बोट वाकवून वडिलांना सलाम केला. यामागे एक प्रेरणादायी कथा आहे. न्यूझीलंडमध्ये जन्मलेले बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स हे रग्बी खेळाडू होते. आपले करिअर कायम ठेवण्यासाठी आणि ऑपरेशन करून बाहेर बसण्याऐवजी त्यांनी आपले बोट कापून टाकले होते. त्यामुळे स्टोक्स आपल्या वडिलांच्या या संघर्षाला सलाम करत आपले मधले बोट दुमडून त्यांची आठवण काढतो.स्टोक्सपूर्वी इंग्लंडसाठी सर्वाधिक धावसंख्या जेसन रॉयच्या नावावर होती. त्याने २०१८ मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावा केल्या होत्या. स्टोक्सने ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये २४वी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्याही नोंदवली. वनडेत इंग्लंडकडून स्टोक्स आणि जेसन रॉयनंतर ॲलेक्स हेल्स १७१, रॉबिन स्मिथ नाबाद १६७ आणि जोस बटलरच्या नाबाद १६२ धावा आहेत.