लंडन : ‘आम्हाला इंधनावर चालणाऱ्या गाड्या समजणे बंद करा’, अशा शब्दांत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत भावना व्यक्त केल्या. स्टोक्स म्हणाला, ‘खेळाडू वाहनांप्रमाणे नसतात, म्हणजे इंधन भरले की पळणार. तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता, त्यानंतर लगेच एकदिवसीय क्रिकेट सुरू होते. हे मूर्खपणाचे आहे.’
स्टोक्स नुकताच दुखापतीतून सावरला. त्याच्याकडे कसोटी कर्णधारपद सोपविण्यात आले. ‘माझ्या मते जे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळतात त्यांच्यासाठी हा अतिरेक आहे. क्रिकेट खेळणे आधीपेक्षा जास्त कठीण झाले आहे. मी आधी तिन्ही प्रकारांत होतो आणि १०० टक्के योगदान देत होतो. फ्रेंचाइजी क्रिकेटही वाढले आहे. त्यामुळे खेळाडूंवरील मानसिक ताण वाढत आहे,’ असे मत स्टोक्सने व्यक्त केले.
पराभवाने घेतला निरोप
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारी पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडने ६२ धावांनी गमावला. हा स्टोक्सचा अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ४६.५ षटकांत २७१ धावांत संपुष्टात आला. स्टोक्स केवळ ५ धावा काढून परतला. जेसन रॉय (४३) व जॉनी बेयरस्टो (६३) यांनी शतकी सलामी दिली होती. ज्यो रुटनेही (८६) चांगली झुंज दिली.