सिडनी : २०१८ च्या चेंडू कुरतडण्याच्या वादाविषयी आपल्याकडे कुठलीही नवी माहिती नसल्याचा कॅमेरून बेनक्रॉफ्टने यू टर्न घेतला. रविवारी या गोलंदाजाने, न्यूलॅन्ड्स कसोटीदरम्यान झालेल्या या चुकीच्या प्रकाराची गोलंदाजांना माहिती होती, असा गौप्यस्फोट केला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश देताच बेनक्रॉफ्ट बॅकफूटवर आला.
सध्या इंग्लंडमध्ये डरहम संघाकडून कौंटी खेळत असलेल्या बेनक्रॉफ्टने सीएच्या नैतिक समितीशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. ‘सिडनी मॉर्निंंग हेरॉल्ड’च्या सूत्रानुसार, बेनक्रॉफ्टने सोमवारी आपल्या उत्तरात स्पष्ट केले की, सीएला देण्यासाठी माझ्याकडे कुठलीही नवी माहिती नाही. बेनक्रॉफ्ट हा २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तिसऱ्या कसोटीत चेंडूवर चकाकी आणणारा पदार्थ लावताना कॅमेऱ्यात दिसत होता.
आम्हीही अनभिज्ञचेंडू कुरतडण्याच्या प्रकाराची आम्हाला कुठलीही माहिती नव्हती, असे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क आणि नाथन लियॉन यांनी स्पष्ट केले. ‘बेनक्रॉफ्टने दिलेल्या माहितीशी आमचा संबंध नाही. अशा अफवांवर बंदी घालण्यात यावी. आम्हाला आमच्या प्रामाणिकपणावर गर्व वाटतो. त्या घटनेपासूृन आम्ही बोध घेतला आहे. आता पुढचा विचार करणे गरजेचे असून, त्या दिवशी मैदानावर जे घडले ते घडायला नको होते. आम्हा सर्वांना त्या गोष्टीचा पश्चात्ताप आहे,’ असे गोलंदाजांनी संयुक्त निवेदनात सांगितले.