Manoj Tiwary Retirement: क्रिकेट अन् राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या मनोज तिवारीने अखेर क्रिकेटला रामराम केले आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये बिहारविरूद्ध अखेरचा सामना खेळला. बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीमधून निवृत्ती घेतली आहे. विशेष बाब म्हणजे मनोज तिवारीने त्याचा शेवटचा सामना ईडन गार्डन्समध्ये खेळला. घरच्या मैदानावर कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळायला मिळाल्याने त्याने आनंद व्यक्त केला.
खरं तर मनोज तिवारी यापूर्वी देखील निवृत्त झाला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, काही दिवसांनंतर त्याने आपला निर्णय मागे घेत आणखी एक वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला. रणजी ट्रॉफीच्या या हंगामात त्याने बंगालचे नेतृत्व केले आणि त्याच्या शेवटच्या सामन्यात बिहारविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला.
मनोज तिवारीची निवृत्ती
दरम्यान, मनोज तिवारीसाठी हा खूप भावनिक क्षण होता. सामना संपल्यानंतर त्याने खेळपट्टीवर गुडघे टेकून कृतज्ञता व्यक्त केली आणि सहकारी खेळाडूंसोबत फोटो काढले. यादरम्यान खेळाडूंनी त्याला स्वाक्षरी केलेली जर्सी, संघ आणि ग्राउंड स्टाफचे फ्रेम केलेले फोटो भेट दिले. बंगाल क्रिकेट असोसिएशननेही मनोज तिवारीचा गौरव केला. त्याला सुवर्ण बॅट देऊन गौरविण्यात आले.
मनोज तिवारीने निवृत्तीची घोषणा करताना एक मोठे विधान केले. तो म्हणाला की, माझ्या आवडत्या मैदानावर अखेरचा सामना खेळला याचा आनंद आहे, इथेच याच घरच्या मैदानावर निवृत्त झालो याचाही खूप आनंद आहे. बंगालसाठी रणजी ट्रॉफी जिंकू शकलो नाही याचे फक्त दु:ख वाटत राहील. मनोज तिवारीने टीम इंडियासाठी देखील सामने खेळले. त्याने आपल्या वन डे कारकिर्दीत १२ सामने खेळले ज्यात २८७ धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. तसेच तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला १५ धावा करता आल्या.
Web Title: Bengal captain Manoj Tiwary has retired from the Ranji Trophy and played his last match against bihar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.