Ranji Trophy : देशातील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट घोंगावू लागले असून, स्पर्धा सुरू होण्यास १० दिवस असतानाच बंगालच्या रणजी संघातील सात सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रणजी करंडक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र तत्पूर्वीच मोठ्या प्रमाणात खेळाडू पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि संघाचा एक व्हिडीओ अॅनॅलिस्ट यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दुबेच्या जागी साईराज पाटील याला संघाला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. असे असूनही रणजी करंडक स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं स्पष्ट केलं.
अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता बंगालनं २१ सदस्यीय संघ जाहीर केला. बंगालचे क्रीडा मंत्री व भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारी याची या संघात निवड केली आहे. त्यानं याच वर्षी तृणमुल काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला होता. ३६ वर्षीय मनोजनं भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. रणजी करंडक स्पर्धेत बंगालला B गटात स्थान मिळाले आहे आणि त्यांच्यासमोर विदर्भ, राजस्थान, केरळा, हरयाणा व त्रिपुरा यांचे आव्हान आहे.
बंगालच्या कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या खेळाडूंमध्ये सुदीप चॅटर्जी, अनुस्तूप मजुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी व प्रदीप्ता प्रामाणिक यांचा समावेश आहे.