IPL 2023, Delhi Capitals । नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या 16व्या हंगामाकडे कूच करत आहे. उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार असून सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. मागील वर्षाच्या अखेरीस दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचा अपघात झाला. तेव्हापासून पंत क्रिकेटपासून दूर असून सध्या विश्रांती घेत आहे. त्यामुळे या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, रिषभ पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने बंगालचा यष्टीरक्षक अभिषेक पोरलला संघात स्थान दिले आहे. ESPNcricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्ली येथे झालेल्या सराव सत्रानंतर पोरलची दिल्लीच्या संघात निवड करण्यात आली आहे. दिल्लीच्या संघाचे डायरेक्टर सौरव गांगुली आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी 4 यष्टीरक्षकांची चाचपणी केली. यामध्ये अभिषेक पोरलसह, लुविंथ सिसोदिया, शेल्डन जॅक्सन आणि विवेक सिंग यांचा समावेश होता. अखेर बंगालच्या स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या अभिषेकची रिषभ पंतच्या जागी निवड करण्यात आली आहे.
वॉर्नर सांभाळणार कर्णधारपदाची धुरादिल्ली कॅपिटल्समध्ये पृथ्वी शॉ, मनीष पांडे यांच्याशिवाय मिचेल मार्श यांना कर्णधारपदाचा अनुभव आहे. पण डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल विजेतेपद आणि ऑस्ट्रेलियाचे यशस्वी नेतृत्व केल्याने त्याला दिल्लीचा कर्णधार बनवण्यात आले आहे. वॉर्नर संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. पंत आयपीएल 2023 मधून पूर्णपणे बाहेर पडला, त्यामुळे वॉर्नरची दीर्घ कालावधीनंतर कर्णधारपदी वर्णी लागली आहे.
आगामी हंगामासाठी रिषभ पंतचा संघ -अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"