mamata banerjee । नवी दिल्ली : शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला 7 बळींनी नमवत पहिल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे महिला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताचे हे पहिले विश्वविजेतेपद ठरले. वरिष्ठ स्तरावर भारतीय संघाला तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी पहिला विश्वचषक पटकावून दिला. विश्वविजेत्या टीम इंडियातील बंगालच्या खेळाडूंसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी अंडर-19 ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत विजयी झालेल्या संघात सहभागी असलेल्या बंगालच्या खेळाडूंसाठी रोख रक्कम जाहीर केली आहे. खरं तर दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे भारताने अंतिम फेरीत इंग्लंडला सात गडी राखून पराभूत केले आणि विश्वचषकावर नाव कोरले.
'टीम इंडिया'तील बंगालचे खेळाडू मालामालसोमवारी केएमडीए उन्नत भवन येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आणि खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की, विश्वविजेत्या संघातील 4 सदस्य, रिचा घोष, टिताश साधू, हृषिता बसू आणि गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता यांना या यशस्वी कामगिरीबद्दल प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील आणि ते मायदेशात परतल्यानंतर त्यांचा सत्कार केला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे काल BCCI चे सचिव जय शाह यांनी 19 वर्षाखालील मुलींनी विश्वचषक स्पर्धेतील यश मिळवल्यानंतर भारतीय संघासाठी 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
अंडर-19 विश्वचषकात भारतीय खेळाडूंचा बोलबालास्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -
- श्वेता सेहरावत (भारत) - 297 धावा
- ग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) - 293 धावा
- शेफाली वर्मा (भारत) - 172 धावा
- इमान फातिमा (पाकिस्तान) - 157 धावा
- जॉर्जिया प्लिमर (न्यूझीलंड) - 155 धावा
सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू -
- मॅगी क्लार्क (ऑस्ट्रेलिया) - 12 बळी
- पार्श्वरी चोप्रा (भारत) - 11 बळी
- हॅना बेकर (इंग्लंड) - 10 बळी
- अनोसा नासिर (पाकिस्तान) - 10 बळी
- ग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) - 9 बळी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"