निसर्गावर प्रभुत्व गाजवणे माणसाच्या हातात नसल्याने पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडचा डाव जवळपास संपल्यासारखा असताना विश्वचषकाचा उपांत्य सामना रोखावा लागला. पावसापासून बचाव करण्यासाठी मैदान केवळ अंशता का झाकण्यात आले हे समजण्यापलिकडचे होते. इंग्लंड असा देश आहे की जेथे सर्व काही शक्य आहे. येथील नागरिक कुठल्याही बाबींवर भाष्य करतात. जगावर अद्याप आमचेच राज्य असल्याचा त्यांचा समज आहे. पावसानंतर इतर देशांत खेळ रद्द झाला असता, तर साधने उपलब्ध नसताना विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा कशी काय देण्यात आली, असा प्रश्न विचारला असता.
मँचेस्टरमध्ये स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता कव्हर काढण्यात आले तेव्हा झाकल्यानंतरही डबके साचलेले दिसले. पण मैदान पूर्ण का झाकण्यात आले नाही, हा प्रश्न कोण विचारणार. अनेक सामने पावसात धुतले गेले, अन्यथा निकाल वेगळे राहिले असते.दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला नमविल्यास ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. एजबॅस्टन मैदानावर पूर्ण कव्हरची व्यवस्था आहे. पावसाची शक्यता वर्तविल्यानंतरही अन्य मैदानांच्या तुलनेत येथे सामना लवकर सुरू करण्याची सोय आहे.
इंग्लंड विजयाचा दावेदार वाटतो. जेसन रॉय व जॉनी बेयरेस्टो हे संघाचा कणा आहेत. सहाव्या स्थानावरील जोस बटलर मोठ्या फटकेबाजीसाठी प्रख्यात असून वोक्स-मोईन हेही उपयुक्त योगदान देतात. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगवान माºयाच्या बळावर प्रतिस्पर्धी संघांना रोखण्यास इंग्लंड सक्षम वाटतो. आॅस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा व मार्कस् स्टोयनिस या दोन नियमित खेळाडूंना गमावले. अॅलेक्स केरी हा या स्पर्धेतील शोध ठरला.सुनील गावसकर