Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( LSG vs RCB) सामन्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जबरदस्त राडा झाला. ज्यावर आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी आपली बाजू मांडली आहे. या सामन्यात RCBने LSGचा १८ धावांनी पराभव केला होता. सामना संपल्यानंतर विराट आणि गौतम यांच्यात बराच वेळ काहीतरी वाद सुरू होता. वाद इतका वाढला की दोन्ही खेळाडूंना शांत करण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.
गौतम गंभीर कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक, पत्नी बिझनेसवुमन; सरकार महिना देते १ लाख पगार
विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांनाही आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या १००% दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच विराटसोबत गैरवर्तन करणाऱ्या LSGचा युवा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यालाही त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले,''आता कोहली आणि गंभीरने हे प्रकरण इथेच संपवायला हवे. या सर्व गोष्टी एक-दोन दिवसांत पूर्ण होतील आणि मग त्यांना समजेल की आपण ही परिस्थिती थोडी चांगली समजून घ्यायला हवी होती.'' गौतम गंभीर याआधी ज्या राज्यातून खेळला आहे, त्याच राज्यातून विराट कोहलीही खेळतो.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक पुढे म्हणाले,''गौतम गंभीरने दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत आणि विराट हा अनेकांचा आदर्श आहे. दोघेही दिल्लीचे आहेत. दोघांनाही एकाच ठिकाणी बसवून समजावून सांगावे की आता या गोष्टी टाळायला हव्यात. फक्त आत्ताच नाही तर कायमचे. मला वाटते की बीसीसीआयने असा नियम बनवला पाहिजे की ज्या खेळाडूंमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल त्यांना एका ठिकाणी बोलावून तो तंटा सोडवायला हवा आणि त्याच वेळी असे पुन्हा होऊ नये अशी ताकीद देखील दोघांना द्यायला हवी.''
''लाइव्ह टेलिव्हिजनवर हे सर्व पाहणे कोणालाही आवडत नाही, विशेषत: भांडणानंतर. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि या दोन्ही खेळाडूंनी ती मर्यादा ओलांडली आहे. जे काही झाले ते तुम्ही दोघांनी मिळून दुरुस्त करा आता भविष्यात ते खपवून घेतले जाणार नाही,''असेही शास्त्री म्हणाले.