भारतीय संघासाठी निवड होण्याकरीता Yo Yo Test ही सर्व खेळाडूंना बंधनकारक करण्यात आली आहे. खेळाडूंना या टेस्टच्या माध्यमातून स्वतःची फिटनेस सिद्ध करावी लागले आणि त्यानंतरच त्यांची निवड केली जाते. आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी श्रीलंकेत रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंची Yo Yo Test घेतली गेली आणि त्यानंतर संघ जाहीर केला गेला. जे खेळाडू संघाचा भाग नाही त्यांनाही ही टेस्ट बंधनकारक आहे. जेणेकरून राखीव खेळाडू म्हणून बोलावणे झाल्यास त्यांना बोलावले जाऊ शकते.
विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून फिटनेसवर त्याने अधिक भर दिला. त्याचा स्वतःचा फिटनेस हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सध्याच्या भारतीय संघात युवा खेळाडू शुबमन गिल हा सर्वाधिक गुण मिळवणारा फिट खेळाडू आहे. त्यानंतर विराटचा क्रमांक येतो. पण, या दोघांपेक्षाही Yo Yo Test मध्ये अधिक मार्क मिळवणारा खेळाडू संघाबाहेर आहे. २०२२ पासून भारताच्या कसोटी संघातून दूर असलेल्या मयांक अगरवालची ( Mayank Agarwal) फिटनेस पाहून सर्वच चकीत झाले आहेत. मयांकने यो यो टेस्मध्ये २१.१ गुण मिळवले आहेत आणि त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
विराटला १७.२ गुण, तर शुबमनला १८.७ गुण मिळाले आहेत. पण, यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवणारा मयांक संघाबाहेर आहे. मयांक हा कसोटी संघाचा सद्स आहे आणि त्याने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी मॅच खेळली होती. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. जुलै २०२२ मध्ये त्याला रोहित शर्माच्या जागी राखीव खेळाडू म्हणून इंग्लंड दौऱ्यावर बोलावण्यात आले होते. रोहितचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मयांकने आतापर्यंत २१ कसोटी व ५ वन डे सामने खेळले आहेत.