Join us  

कोटलावरील आयपीएल सामन्यात सट्टेबाजी?

‘एसीयू’ला शंका : सट्टेबाजांच्या संपर्कात राहिलेला सफाई कर्मचारी पळाला; दिल्ली पोलिसांनी दोघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 1:02 AM

Open in App

नवी दिल्ली : कोरोनामुळे मंगळवारी स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल-१४ च्या येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यांदरम्यान सट्टेबाजी करण्यात आल्याची शंका बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीयू)व्यक्त केली आहे. एसीयू प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी या मैदानावर झालेल्या सामन्यादरम्यान सफाई कर्मचाऱ्याने सट्टेबाजांना मदत केल्याची शंका उपस्थित केली. क्रिकेटच्या भाषेत ज्याला‘ पिच सीडिंग’ असे संबोधतात, ती माहिती हा कर्मचारी पुरवीत होता. 

गुजरात पोलीस दलाचे माजी प्रमुख खंडवावाला म्हणाले, ‘एसीयूच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची माहितीे दिल्ली पोलिसांना सोपविण्यात आली. तो संशयास्पद आरोपी मात्र दोन्ही मोबाईल सोडून पळून जाण्यात यशस्वी ठरला. एसीयूने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एसीयूच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांत २ मे रोजी झालेल्या सामन्याच्या वेळी  बनावट ओळखपत्रासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोनदा हे लोक कोटलाच्या आत प्रवेश करण्यात यशस्वी ठरले होते. जी व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरली तो सफाई कर्मचारी होता. आमच्याकडे त्याची संपूर्ण माहिती आहे. तो आयपीएलदरम्यान कामावर असल्यामुळे त्याचे आधारकार्ड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.  काही रकमेच्या मोबदल्यात तो काम करीत असावा, अशी शंका आहे. 

कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा उपयोग मोठ्या कटात अलगद केला जातो. बायो बबलमुळे कुठल्याही व्यक्तीला खेळाडूंचे हॉटेल आणि ड्रेसिंग रूममध्ये पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे परिस्थितीनुसार सट्टेबाजांनी आपल्या कामाची पद्धत बदलली असावी, हे घटनेवरून दिसते,’ असे हुसेन यांनी सांगितले.सफाई कर्मचाऱ्यावर एसीयूला कशी शंका आली, असे विचारताच हूसेन म्हणाले, ‘ती व्यक्ती कोटला स्टेडियमवर एकांतात वावरत होती. आमच्या एका अधिकाऱ्याने येथे तू काय करतो? असा सवाल कराताच ती व्यक्ती म्हणाली, ‘मी प्रेयसीसोबत बोलत आहे.’ यावर अधिकाऱ्याने त्याला नंबर डायल करून फोन माझ्याकडे दे, असा प्रश्न केला. अधिकारी त्याचा मोबाईल तपासत असताना तो पळून जाण्यात यशस्वी झाला. त्या व्यक्तीकडे आयपीएल अधिस्वीकृती कार्ड होते, हे विशेष. त्याने आयकार्ड गळ्यात घातले होते; शिवाय त्याच्याकडे दोन मोबाईलही होते. तो एखाद्या बड्या बुकीला माहिती पुरवीत असावा, अशी शंका आल्याने आम्ही पोलिसांना तत्काळ कळविले. पोलिसांनीही तत्काळ कारवाईअंतर्गत दोघांना ताब्यात घेतले.’

कसे असते पीच सिडिंग...nपीच सिडिंगच्या साहाय्याने प्रत्येक चेंडूवर सट्टेबाजी करण्यात येते. याद्वारे प्रत्यक्ष सामना आणि त्याचे टीव्हीवर होणारे प्रसारण या काळातील काही सेकंदांचा फरक सट्टेबाजांसाठी लाभदायी ठरतो. मैदानावर उपस्थित व्यक्ती टीव्ही प्रसारणाआधीच पुढच्या चेंडूवरील हालचालीचा निकाल पुरवितो. पीच सिडिंगच्या साहाय्याने प्रत्येक चेंडूवर सट्टेबाजी करण्यात येते. याद्वारे प्रत्यक्ष सामना आणि त्याचे टीव्हीवर होणारे प्रसारण या काळातील काही सेकंदांचा फरक सट्टेबाजांसाठी लाभदायी ठरतो. मैदानावर उपस्थित व्यक्ती टीही प्रसारणाआधीच पुढच्या चेंडूवरील हालचालीचा निकाल पुरविते.nआयपीएलचे एकूण २९ सामने झाले. यादरम्यान कोणत्याही खेळाडू आणि कर्मचाऱ्याकडे भ्रष्टाचारासाठी संपर्क झाल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही.

मुंबई पोलीस होते सतर्क....मुंबईतील सामन्यादरम्यान सनरायझर्स संघ ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, त्याच हॉटेलमध्ये शंकास्पदरीत्या वावरत असलेले तिघेजण थांबले होते. त्यांची नावे एसीयूकडे आहेत. हे तिघेही खेळाडूंच्या संपर्कात आले नव्हते, हेदेखील स्पष्ट झाले आहे. आम्हाला माहिती मिळताच मुंबई पोलिसांना कळविण्यात आले. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाई करीत या तिघांना ताब्यात घेतले होते, असे हुसेन यांनी सांगितले.

 

टॅग्स :आयपीएल २०२१