दुबई : येथे २०२१ ला झालेल्या एमिरेट्स टी-१० क्रिकेट लीगमधील सामन्यांचा निकाल फिक्स करण्यासाठी भ्रष्ट मार्ग अवलंबल्याचा आठ खेळाडूंवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात तीन भारतीयांसोबतच काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी सांगितले.
आरोपी भारतीयांमध्ये सहभागी पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक पराग संघवी, कृष्णकुमार यांचा समावेश आहे. त्याच सत्रात त्यांचा एक खेळाडू बांगलादेशचा माजी कसोटीपटू नासीर हुसेन याच्यावरदेखील भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या उल्लंघनाचे आरोप लागले होते. फिक्सिंगमध्ये समाविष्ट असलेल्या तिसऱ्या भारतीयाचे नाव सन्नी ढिल्लो असे असून तो फारसा परिचित नसलेला फलंदाजी कोच आहे.आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार हे आरोप २०२१ च्या अबुधाबी टी-१० लीग तसेच सामन्यांचा निकाल फिरविण्याशी संबंधित आहेत. सामन्याचा निकाल फिरविण्यासाठी सट्टेबाजीचे प्रयत्न झाले होते. आयसीसीने या स्पर्धेसाठी एमिटेट्स बोर्डाद्वारे नामनियुक्त भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्यामुळे ईसीबीकडूनच हे आरोप लावण्यात आले आहेत.
संघवीवर सामना फिक्स करणे आणि सट्टेबाजीचा तसेच तपास यंत्रणेला सहकार्य न करण्याचा आरोप आहे. कृष्णकुमारवर तपासात काही गोष्टी दडविल्याचा आरोप असून ढिल्लोवर मॅच फिक्सिंगचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बांगलादेशकडून १९ कसोटी आणि ६५ वनडे खेळलेल्या नासीरवर तपास अधिकाऱ्यांनी ७५० डॉलरहून अधिक रकमेच्या भेटवस्तूंचा खुलासा न केल्याचा ठपका ठेवला आहे. ज्या अन्य लोकांना निलंबित करण्यात आले, त्यात फलंदाजी कोच अझहर झैदी, यूएई संघाचा स्थानिक खेळाडू रिझवान जावेद आणि सालिया समन, संघव्यवस्थापक शादाब अहमद यांचा समावेश आहे. तीन भारतीयांसह सहा जणांवर स्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवार (दि.१९)पर्यंत या सर्वांना आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी लेखी उत्तर सादर केले की काय, याबाबत माहिती बाहेर आलेली नाही.