Cricket Fan Wins 90 Lakh Prize Money After Taking Kane Williamson Catch : आयपीएलच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतही टी- २० चा थरार पाहायला मिळतो. Betway SA20 लीगच्या तिसऱ्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरले आहेत. आता टी-२० लीगमुळे अनेक खेळाडू एका रात्रीत लखपती अन् करोडपती झाल्याचे किस्से तुम्ही ऐकले असतील. पण दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या स्पर्धेत स्टँडमध्ये सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेला क्रिकेट चाहता एका क्षणात लखपती झाला आहे. क्रिकेट चाहत्याने स्टँडमध्ये कॅचसह ९० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. जाणून घेऊयात त्यामागची खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् क्रिकेट मॅच बघता बघता चाहता झाला मालामाल
१० जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना डरबन सुपर जाएंट्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात डरबनच्या संघाने रोमहर्षक सामन्यात २ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार बॅटर केन विलियम्सन याने दमदार अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीत त्याने मारलेला उत्तुंग सिक्सर चाहत्याला लखपती करून देणारा ठरला. त्याने स्टेडिममध्ये मारलेला सिक्सरवर चाहता मालामाल झाला.
जिथं केन विलियम्सनला ६ धावा मिळाल्या तिथं चाहत्यानं कमावले ९० लाख रूपये
केन विलियम्सनचा एका हातात झेल घेणाऱ्या चाहत्याने जवळपास ९० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. डरबन सुपर जाएंट्सच्या १७ व्या षटकात ईथन बॉश गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर केन विलियम्सन याने गुडघ्यावर बसून अप्रतिम फटका मारला. स्टार क्रिकेटरनं मारलेला हा फटका थेट डीप मिड विकेटच्या दिशेनं प्रेक्षकांच्या गर्दीपर्यंत पोहचला. मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याने केननं मारलेला सिक्सर फिल्डबाहेर अप्रतिम कॅचमध्ये बदलला. यावर केनसह त्याच्या संघाला ६ धावा मिळाल्या त्याच चेंडूवर चाहत्याला ९० लाख रुपये मिळाले.
फिल्डबाहेर अन् स्टेडियम सँडमध्ये कॅच घेणाऱ्यासाठी बक्षीस
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या SA20 लीगमध्ये Betway स्पॉन्सर आहे. त्यांनी या स्पर्धेत चाहत्यांसाठी Betway Catch a Million स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेअंतर्गत मॅचचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांनी कॅच पकडला तर १ मिलियन रँड (दक्षिण आफ्रिकेचे चलन) बक्षीस दिले जात आहे. भारतीय चलनानुसार ही ही रक्कम जवळपास ४५ लाख रुपये इतकी होते. जर कॅच घेणारा Betway चा ग्राहक असेल तर बक्षीसाची रक्कम दुप्पट होते. आता ही रंजक स्टोरी वाचल्यावर काही भारतीय क्रिकेट चाहत्यांना IPL मध्ये ही स्कीम येईल का? अर्थात चाहत्यांना 'करोडपती' करणारी योजना लागू व्हायला पाहिजे असा विचारही मनात येऊ शकतो.
Web Title: Betway SA20 Cricket Fan Took Kane Williamson One Hand Catch In Stand And Won 90 lakh prize money
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.