गाले : प्रत्येक आघाडीवर यजमान संघाला अडचणीत आणणाºया टीम इंडियाने पहिल्या कसोटीत चौथ्याच दिवशी ३०४ धावांनी शानदार विजय साकारला. या विजयामुळे दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर झालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता करीत, तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.धावासंदर्भात विदेशात भारताचा हा सर्वांत मोठा विजय ठरला. याआधी भारताने १९८६ मध्ये लीड्सवर इंग्लंडला २७९ धावांनी नमविले होते. लंकेसाठीही धावांच्या बाबतीत हा सर्वांत मोठा पराभव ठरला. याआधी पाकने १९९४ मध्ये लंकेला ३०१ धावांनी धूळ चारली होती.यजमानांना ५५० धावांचे लक्ष्य गाठणे कठीण झाले होते. चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात फलंदाजांनी कुठलाही प्रतिकार न करता फिरकी माºयापुढे ७६.५ षटकांत २४५ धावांत सहज नांगी टाकली. जखमी कर्णधार रंगना हेरथ आणि आसेला गुणरत्ने फलंदाजीसाठी येऊ शकले नाहीत. त्याआधी भारताने दुसरा डाव ३ बाद २४० धावांवर घोषित केला. पहिल्या डावात अवघ्या तीन धावांवर बाद झालेला कर्णधार विराट कोहली याने नाबाद १०३ धावांची खेळी करीत १७ वे शतक साजरे केले.लंकेने चहापानापर्यंत ४ बाद १९२ पर्यंत वाटचाल केली होती. दिमुथ करुणारत्ने याने सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर भारताकडून रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. चहापानानंतर नंतर करुणारत्ने बाद होताच भारताचा विजय साकार झाला. त्याआधी उपहारानंतर करुणारत्ने- कुसाल मेंडिस यांनी तिसºया गड्यासाठी चांगली भागीदारी करीत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. करुणारत्नेने १२ वे कसोटी अर्धशतक गाठले. दरम्यान, लंकेच्या १०० धावा २७ षटाकांत झाल्या. मेंडिसने जडेजाच्या चेंडूवर झेल देताच ४ बाद ११६ अशी स्थिती होती. करुणारत्ने- डिकवेला यांनी पाचव्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
कोहलीचा विक्रम...आजच्या खेळीदरम्यान कोहलीने माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (११६ कसोटी) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ कसोटी) यांच्या प्रत्येकी १७ शतकांची बरोबरी केली. कोहलीने ५८ व्या षटकांत ही किमया साधली.वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध भारताने ६१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताची लंकेविरुद्धची ६०० ही सर्वांत मोठी धावसंख्या आहे.कोहली- रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी ५१ धावांची नाबाद भागीदारी केली. भारतासाठी कसोटीत २००० किंवा त्याहून अधिक धावा काढणारी १४ वी जोडी ठरली.कोहलीने कर्णधार म्हणून विदेशात सर्वाधिक वेगवान १००० धावा काढल्या. त्याने१७ डावांत ही कामगिरी केली आहे. याआधी सचिन तेंडुलकरने १९ डावांत विदेशात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठला होता.अझहरला पिछाडीवर सोडले...कर्णधार म्हणून ४४ डावांमध्ये १० वे कसोटी शतक ठोकताना विराटने माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनचा (६८ डावांमध्ये ९ शतके) विक्रम मोडला. या यादीमध्ये सर्वांत आघाडीवर सुनील गावस्कर आहेत. विराटला गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी आहे. गावस्कर यांनी कर्णधार म्हणून ७४ डावांमध्ये ११ शतके ठोकली आहेत.नंबर गेम...३०४ धावांनी मिळवलेला विजय हा भारताचा विदेशी भूमीवरील सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी, भारताने १९८६ मध्ये इंग्लंडचा हेडिंग्ले येथे २७९ धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीत भारताचा हा चौथा मोठा विजय आहे.0 (शून्य) वेळा एवढ्या मोठ्या फरकाने श्रीलंकेचा पराभव झाला होता. याआधी, श्रीलंकेचा सर्वांत मोठा पराभव पाकविरुद्ध १९९४ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे, श्रीलंकेचे तीन मोठ्या पराभवांपैकी दोन पराभव हे याच वर्षी झाले. केपटाउन येथे जानेवारीत त्यांना २८२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.0३ विजय नोंदवत कर्णधार म्हणून विराट कोहलीने श्रीलंकेतील विजयाच्या रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. आॅस्ट्रेलियाने २००३-०४ मध्ये श्रीलंकेचा ३-० ने पराभव करीत एकतर्फी मालिका जिंकली होती. भारताच्या इतर सर्व कर्णधारांनी मिळून १८ कसोटी सामन्यांतून केवळ ४ विजय नोंदवले आहेत.५५० हे भारताने उभे केलेले लक्ष्य हे सर्वात मोठे दुसरे लक्ष्य आहे. याआधी हा आकडा ६१७ एवढा होता. २००८-०९ मध्ये न्यूझीलंविरुद्ध वेलिंग्टन येथे भारताने ही धावसंख्या उभारली होती. हा सामना अनिर्णित झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० आणि त्यापेक्षा अधिक धावसंख्या भारताने पाचव्यांदा उभारली आहे.६/१३८ अशी आजच्या सामन्यातील रवींद्र जडेजाची कामगिरी. त्याची विदेशी भूमीवरील कसोटीतील सर्वात्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी २०१२-१३ मध्ये डर्बन येथे जडेजाने १५४ धावांत ६ बळी घेतले होते. भारताबाहेरील ९ कसोटी सामन्यांतून जडेजाने २७ बळी घेतले असून त्याची सरासरी ३७.६२ एवढी आहे.विदेशातील सर्वांत मोठा विजयभारताने गाले कसोटी सामन्यांत श्रीलंकेचा चौथ्या दिवशी ३०४ धावांनी पराभव केला. धावांचा विचार करता भारताचा विदेशातील हा सर्वांत मोठा विजय ठरला.यापूर्वी भारताने १९८६ मध्ये लीड््स कसोटीमध्ये इंग्लंडचा २७९ धावांनी पराभव केला होता.भारताने श्रीलंकेपुढे ५५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंका संघाचा दुसरा डाव २४५ धावांत संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात ६०० धावांची मजल मारली होती.धावफलक...भारत पहिला डाव : ६००, श्रीलंका पहिला डाव : २९१. भारत दुसरा डाव : शिखर धवन झे. गुणतिलका गो. परेरा १४, अभिनव मुकुंद पायचित गो. गुणतिलका ८१, चेतेश्वर पुजारा झे. मेंडिस गो. कुमारा १५, विराट कोहली नाबाद १०३, अजिंक्य रहाणे नाबाद २३, अवांतर ४, एकूण: ५३ षटकांत ३ बाद २४० वर डाव घोषित. गडी बाद क्रम: १/१९, २/५६, ३/१८९. गोलंदाजी: प्रदीप १२-२-६३-०, परेरा १५-०-६७-१, कुमारा १२-१-५९-१, हेरथ ९-०-३४-०, गुणतिलका ५-०-१६-१.श्रीलंका दुसरा डाव : दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आश्विन ९७, उपुल थरंगा त्रि. गो. शमी १०, धनुष्का गुणतिलका झे. पुजारा गो. यादव २, निरोशन डिकवेला झे. साहा गो. आश्विन ६७, दिलरुवान परेरा नाबाद २१, नुवान प्रदीप झे. कोहली गो. आश्विन ००, लाहिरु कुमारा झे. शमी गो. जडेजा ००, रंगना हेरथ निवृत्त ००, दास गुणरत्ने निवृत्त ००, अवांतर १०, एकूण : ७६.५ षटकांत २४५ धावा. गडी बाद क्रम: १/२२, २/२९, ३/१०८, ४/११६, ५/२१७, ६/२४०, ७/२४०, ८/२४५. गोलंदाजी: शमी ९-०-४३-१, यादव ९-०-४२-१, जडेजा २४.५-४-७१-३, आश्विन २७-४-६५-३, पांड्या ७-०-२१-०.