- सुनील गावस्कर लिहितात...
श्री लंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-० ने विजय मिळवण्याचे संकेत दिले आहेत. गोलंदाजांना अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फलंदाजांना कसोटी क्रिकेटला आवश्यक तंत्र दाखविता आले नाही आणि त्यांच्यात शिस्तही दिसली नाही. या कसोटी सामन्यात श्रीलंका संघ फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो केवळ संघर्ष करीत असल्याचे दिसले. श्रीलंक संघ युवा असून सध्या संक्रमणाच्यास्थितीत आहे. एक-दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले किंवा आजारी पडले आहेत. अशा स्थितीत एखाद्या खेळाडूने अनन्यसाधारण कामगिरी केली नाही, तर भारत या मालिकेत सहज विजय मिळवणार असल्याचे निश्चित आहे.कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. सलामीवीर शिखर धवनने पुनरागमन करताना मिळालेल्या संधीचा लाभ घेतला. त्याने शतकी खेळीदरम्यान शानदार फटके लगावले. श्रीलंकेच्या गोलंदाजांचे कुठलेही आव्हान नसल्यामुळे धवनसाठी फलंदाजी सोपी झाली आणि त्याचमुळे तो बादही झाली. गोलंदाजांचे आव्हान नसल्यामुळे तो पुढे सरसावत फटके खेळण्यास प्रयत्नशील होता. फटका खेळताना टायमिंग न साधता आल्यामुळे तो बाद झाला. त्याचे द्विशतक केवळ १० धावांनी हुकले.पुजारानेही आणखी एक शतकी खेळी केली. विराट कोहली पहिल्या डावात अपयशी ठरला, पण त्याने दुसºया डावात शतकी खेळी केली. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खराब फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेने मधल्या फळीत खेळपट्टीवर महत्त्वाचा वेळ घालविला. उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळी बघायला मिळेल, अशी आशा आहे. कदाचित असे घडणारही नाही. कारण राहुलचे पुनरागमन होणार असून तो धावांसाठी भुकेल्या विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्या साथीनेशतकी खेळी करण्यास उत्सुकअसेल. त्यामुळे कदाचित रहाणेला डाव घोषित करण्यापूर्वी काही वेळ फलंदाजी करण्याची संधी मिळेल. मुकुंदच्या स्थानी राहुलला संघात संधी द्यायची का, हा भारतीय संघासाठी विचार करायला लावाणार प्रश्न ठरणार आहे.दुसºया बाजूचा विचार करता श्रीलंका संघासाठी आत्ममंथन करण्याची गरज आहे. चंदीमलच्या पुनरागमनानंतर श्रीलंका संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. चंदीमलला सूर गवसेल आणि त्यामुळे अन्य फलंदाजांना एक दिशा मिळेल, अशी श्रीलंका संघाला आशा असेल.दिलरुवान परेराने दोन्ही डावांमध्ये चांगली फलंदाजी केली, पण श्रीलंका संघ आणखी एका वेगवान गोलंदाजाबाबत विचार करू शकतो. कारण परेराने जेवढी चांगली फलंदाजी केली तेवढीच सुमार आॅफ स्पिन गोलंदाजी केली. श्रीलंका संघाला खेळपट्टीबाबत अधिक विचार करणे आवश्यक आहे. गालेसारख्या पाटा खेळपट्टीमुळे यजमान संघ अडचणीत येऊ शकतो. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी श्रीलंका संघासाठी लाभदायक ठरू शकते. भोजनाची थाळी श्रीलंकेची असली तरी त्यात काय वाढले जाणार आहे याची भारतीय संघाला चांगली कल्पना आहे आणि त्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. (पीएमजी)