भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करतोय... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो.. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( २००७), वन डे वर्ल्ड कप ( २०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ( २०१३) जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. त्याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग पाचवेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. रांचीतून आलेल्या या खेळाडूने आज जगभरातील क्रिकेट चाहत्यांवर मोहिनी केली आहे. त्याच्या वाढदिवशी माजी फलंदाज वासीम जाफर याने 'कॅप्टन कूल' ची कधी न ऐकलेली कहाणी सांगितली.
महेंद्रसिंग धोनी संघात नवीन होता तेव्हाचा किस्सा जाफरने सांगितला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या धोनीने तेव्हा फक्त ३० लाख रुपये कमावण्याची इच्छा व्यक्त केली होती.''मी, माझी पत्नी, दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी व धोनी एकदा एकत्र जमलो होतो. तेव्हा धोनी माझ्या पत्नीसोबत गप्पा मारता मारता म्हणाला, मला ३० लाख कमवायचे आहेत. जेणेकरून मी रांची येथे आनंदाने अख्खं आयुष्य घालवू शकतो. त्याला रांची सोडायचे नव्हते,''असे जाफरने स्पोर्ट्सकीडाला सांगितले. तो पुढे म्हणाला,''मला आजही आठवतंय तो माझ्या पत्नीला काय म्हणाला होता. भाभी, मुझे ३० लाख रुपये बनाने है!''
''मी २००५मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले होते आणि धोनी तेव्हा संघात नवीन होता. त्याने डिसेंबर २००४ मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. तेव्हा मी कसोटी क्रिकेट खेळायचो,''असेही जाफर म्हणाला. धोनीने ९० कसोटी सामन्यांत ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यात त्याच्या नावावर १९७७३ धावा आहेत आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १६१७ धावा केल्या आहेत. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ३० लाख कमावण्याचे स्वप्न घेऊन क्रिकेटमध्ये आलेला धोनी आज १०४० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.