पर्थ : सध्या टी-२० विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. हा सामना भारतापेक्षा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. कारण आजच्या सामन्यातील भारताचा विजय पाकिस्तानला विश्वचषकात जिवंत ठेवू शकतो. आज भारतीय संघाचा जर पराभव झाला तर पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर होईल. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांसह संघाचे माजी खेळाडू भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. तुमच्या विजयात आमचा विजय असल्याचे पाकिस्तानचे चाहते म्हणत आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रोहित शर्माचा हा निर्णय भारतालाच भारी पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण १३.१ षटकांत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून केवळ ८५ धावा झाल्या आहेत. भारताकडून आता सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक खेळपट्टीवर टिकून आहेत. रोहित शर्मा (१५), लोकेश राहुल (९), विराट कोहली (१२), दीपक हुड्डा (०) आणि हार्दिक पांड्या (२) धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने ४ बळी पटकावून भारतीय संघाची फलंदाजी मोडित काढली.
शोएब अख्तरची भावनिक साद
पाकिस्तानने दुपारी झालेल्या सामन्यात नेदरलॅंड्सचा ६ गडी राखून पराभव केला. याविजयासोबतच पाकिस्तानने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण आजच्या सामन्यातील विजयामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकात जिवंत राहिला आहे. याशिवाय आज होणारा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानसाठी निर्णायक असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर शेजाऱ्यांचे विश्वचषकातील आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"