ठळक मुद्देराधा यादव, असं समस्यांची मॅरेथॉन पार करत भारतीय संघात स्थान मिळालेल्या खेळाडूचं नाव. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात दोन ट्वेन्टी-20 सामने खेळली होती. पण या दोन्ही सामन्यांत तिला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
मुंबई : मुंबईतल्या कांदिवलीत एक चाळीत छोटेखानी घर... घरात 9 जणं. वडिलांचा फुटपाथवर भाजी विकण्याचा धंदा. या व्यवसायातून उत्पन्न किती मिळणार आणि घरातल्या 9 जणांची पोटाची खळगी कशी भरणार, हा प्रश्न तिच्या वडिलांना नेहमीच पडलेला असायचा. पण आपल्या मुलीच्या क्रिकेटच्या वेडापुढे मात्र त्यांचं काही चालायचं नाही. ही मुलगी माझं नाव उंचावणार, हा विश्वास त्यांना होता. क्रिकेटसाठी लागणारी सामुग्री तशी महाग, पण त्यासाठी कधीही त्यांनी आपला हात आखडता घेतला नाही. मुलीनेही बाबांचा विश्वास सार्थ ठरवला आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर तिने भारतीय क्रिकेट संघाचे दार ठोठावले आहे. राधा यादव, असं समस्यांची मॅरेथॉन पार करत भारतीय संघात स्थान मिळालेल्या खेळाडूचं नाव. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात दोन ट्वेन्टी-20 सामने खेळली होती. पण या दोन्ही सामन्यांत तिला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या राधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिली धाव कधी निघते, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.
कांदिवलीमध्ये राहणाऱ्या राधाच्या घरची परिस्थिती बेताचीच. वडील ओमप्रकाश यादव एका सोसायटीच्या बाहेर भाजी विकतात. घरात तसा पैसा आणि राहण्यासाठी जागा कमीच. पण राधाच्या क्रिकेटसाठी कधीच तिच्या बाबांनी तडजोड केली नाही. त्याचे फळही त्यांना मिळालेच. कारण आता भारतीय संघात खेळणाऱ्या राधाचे बाबा, अशी त्यांची ओळख झाली आहे.
राधाने 2011 सालापर्यंत महिला क्रिकेट पाहिलंही नव्हतं. ही गोष्ट दस्तुरखुद्द राधानेच सांगितली आहे. राधा म्हणाली की, " महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलं जातं, हे मला माहितंही नव्हतं. मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मला मिताली राज किंवा झुलन गोस्वामी यांची नावंही मला माहिती नव्हती. मी मुलांबरोबरच क्रिकेट खेळायची, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मी मुलांच्याच संघातून खेळू शकते, असं मला वाटलं होतं. एका इमारतीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत असताना नाईक सरांनी मला पाहिलं, त्यानंतर त्यांनीच मला घडवलं."
भारताच्या 'अ' संघाकडून राधाने काही सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तिने दोन ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांत तिला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. सध्या सुरु असलेल्या तिरंगी स्पर्धेसाठी राधाची भारताच्या संघात निवड करण्यात आली आहे.
Web Title: Bhajiwala's daughter's place in Indian cricket team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.