Sunil Gavaskar, India vs Bharat : गेल्या काही दिवसांपासून इंडिया विरूद्ध भारत असा नावाचा वाद सुरू झाला आहे. G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरले आणि त्यामुळे या चर्चांना वेग आला. आपल्या देशाला भारत हेच नाव योग्य असून इंडिया हे नाव ब्रिटीशांच्या काळात त्यांच्या सोयीनुसार देण्यात आले होते, असा दावा अनेकांनी केला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात भारत माता की जय असे ट्वीट करत नावाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता क्रिकेट जगतातील दिग्गज लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
"भारत हेच आपल्या देशाचे मूळ नाव आहे. त्याला एक सुंदर नाद आहे. पण या गोष्टी अधिकृत स्तरावर मान्य करणं गरजेचं आहे. सरकारी स्तरावर किंवा 'बीसीसीआय'च्या स्तरावर जर हा मुद्दा मान्य झाला तर आपल्या संघाचे नाव 'भारत क्रिकेट टीम' करता येऊ शकेल. याआधीही बऱ्याच ठिकाणी असे बदल झाले आहेत. बर्मा नाव बदलून आता त्याचे म्यानमार करण्यात आले. त्यामुळे मूळ नावाने जर देश ओळखला जाणार असेल तर मला तरी त्यात काहीच वावगं वाटत नाही. पण मुद्दा एवढाच की जे बदल होतील ते सर्व स्तरावर सरसकट व्हायला हवेत," असे स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
नुकतेच माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना पत्र लिहिले होते. त्यात त्याने म्हटले होते की खेळाडूंच्या जर्सीवर इंडिया ऐवजी भारत असे नाव लिहिण्यात यायला हवे. "मला नेहमी असे वाटायचे की भारत या नावानेच आपला देश ओळखला जावा. आपण सारे भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिले होते. आता ते नाव बदलायला हवे. त्यांनी केलेला बदल हा त्यांच्या सोयीसाठी होता. आता आपण पुन्हा मूळ नाव भारत ठेवायला हवे. त्यामुळेच माझी अशी इच्छा आहे की भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर छातीवरील इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव लिहिले जावे", असे सेहवागने म्हटले होते.