मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने झोकात सुरुवात करताना न्यूझीलंड संघावर पूर्ण वर्चस्व मिळवले. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या जोरावर भारताने किवींना दडपणाखाली आणले. मात्र डावाच्या अखेरच्या टप्प्यात किवींच्या मदतीला धावून आलेल्या पावसामुळे पुढील खेळ वाहून गेला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ बाद २११ धावांची मजल मारली होती. खेळण्यायोग्य स्थिती न राहिल्याने पुढील खेळ आता बुधवारी खेळविण्याचा निर्णय झाला. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता उर्वरीत खेळ सुरु होईल.
उपांत्य व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची योजना करण्यात आली आहे. आता न्यूझीलंडच्या डावातील उर्वरीत ३.५ षटकांचा खेळ बुधवारी होईल. पाऊस कायम राहिल्यास व न्यूझीलंडची फलंदाजी झालीच नाही, तर भारताला ४६ षटकांत २३७ धावांचे आव्हान मिळेल. केवळ २० षटकांचा खेळ खेळविण्याचा निर्णय झाल्यास भारताला १४८ धावांचे लक्ष्य मिळेल. त्याचवेळी पावसामुळे सामना रद्द झाला, तर साखळी फेरीतील सर्वाधिक गुणांच्या आधारे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश होईल.
तत्पूर्वी, ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियमवर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराह आणि भुवनेश्वर यांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे न्यूझीलंडची पहिल्या १० षटकात १ बाद २७ धावा अशी अतिशय संथ सुरुवात झाली.मात्र कर्णधार विलियम्सनने केवळ संघाला सावरलेच नाही, तर झुंजार अर्धशतक झळकावून एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाºया किवी फलंदाजाचा मानही मिळवला. त्याने ९५ चेंडूत ६ चौकारांसह ६७ धावांची झुंजार खेळी केली. बुमराहने धोकादायक मार्टिन गुप्टिलला (१) स्वस्तात बाद केले. यानंतर विलियम्सनने हेन्री निकोल्ससह ६८ धावांची सावध भागीदारी केली.
निकोल्सने ५१ चेंडूत २ चौकारांसह २८ धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याला त्रिफळाचीत केले. येथून सर्व सूत्रे घेतली ती विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांनी. दोघांनी तिसºया गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने विलियम्सनचा बहुमूल्य बळी मिळवला. जेम्स नीशाम (१२) व कॉलिन डीग्रँडहोम (१६) झटपट परतल्याने किवींचा अर्धा संघ ४५व्या षटकात २०० धावांत परतला.यानंतर ४७व्या षटकातील पहिल्याच चेंडूनंतर पावसामुळे खेळ थांबला. यावेळी टेलर ८५ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ६७ धावांवर खेळत होता. टॉम लॅथम (३*) त्याला साथ देत होता. भारताकडून भुवनेश्वर, बुमराह, हार्दिक पांड्या, जडेजा व चहल प्रत्येकी एक बळी घेतला.धावफलक :न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. कोहली गो. बुमराह १, हेन्री निकोल्स त्रि. गो. जडेजा २८, केन विलियम्सन झे. जडेजा गो. चहल ६७, रॉस टेलर नाबाद ६७, जेम्स नीशाम झे. कार्तिक गो. हार्दिक १२, कॉलिन डीग्रँडहोम झे. धोनी गो. भुवनेश्वर १६, टॉम लॅथम नाबाद ३. अवांतर - १७. एकूण : ४६.१ षटकात ५ बाद २११ धावा.बाद क्रम : १-१, २-६९, ३-१३४, ४-१६२, ५-२००.गोलंदाजी :भुवनेश्वर कुमार ८.१-१-३०-१; जसप्रीत बुमराह ८-१-२५-१;हार्दिक पांड्या १०-०-५५-१; रवींद्र जडेजा १०-०-३४-१; युझवेंद्र चहल १०-०-६३-१.बुमराहपुढे अडकले फलंदाजजसप्रीत बुमराहने आपल्या प्रभावी गोलंदाजीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवरही छाप सोडली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने नऊ डावात ८२ षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक नऊ षटके निर्धाव टाकली आहेत. एवढी निर्धाव षटके इतर कोणत्याही गोलंदाजाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत टाकता आलेली नाहीत.४७ चेंडूनंतर पहिला चौकारभारताचे ‘ओपनिंग’ गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी जबरदस्त मारा करत किवींची कोंडी केली. सामन्याची सुरुवात भुवनेश्वरने केली. निर्धाव षटक टाकताना त्याने मार्टिन गुप्टिलला बुचकाळ्यात पाडले. बुमराहच्या चौथ्या आणि सामन्याच्या नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर निकोल्सने चौकार ठोकला. तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ८ षटकांत १ बाद १८ अशी होती. यंदाच्या विश्वचषकात सर्वात उशिराने आलेला हा चौकार ठरला. पहिल्या सात षटकात न्यूझीलंडने १ बाद १० धावा अशी अतिशय संथ सुरुवात केली. तसेच पुढील सात षटकात मात्र त्यांनी ४३ धावा फटकावल्या.टेलरची नाबाद झुंजार खेळीभारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे किवींचा डाव अडखळल्यानंतर संघातील सर्वात अनुभवी फलंदाजरॉस टेलरने संयमी अर्धशतक झळकावत झुंजार खेळी केली. त्याने कर्णधार विलियम्सनसह महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करुन न्यूझीलंड संघाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढले. ४४व्या षटकात त्याने आक्रमक पवित्रा घेतयुझवेंद्र चहलवर हल्ला चढवला. या षटकात किवींनी १८ धावा वसूल करण्यात यश मिळवले.कर्णधार केन विलियम्सन एकाच विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला. यंदा त्याने ५४८ धावा पूर्ण करताना २०१५ साली मार्टिन गुप्टिलचा ५४७ धावांचा विक्रम मागे टाकला.यंदाच्या विश्वचषकात दुसऱ्यांदा न्यूझीलंडने संथ गतीने शंभर धावा केल्या. त्यांनी भारताविरुद्ध २८.१ षटकांमध्ये शतक पूर्ण केले, तर याआधी पाकिस्तानविरुद्ध ३१.२ षटकात शतक पूर्ण केले होते.ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर यंदाच्या विशचषकातील झालेल्या सर्व पाच सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता ठरला आहे.मैदानावरुन विमान उड्डाणाला बंदीमॅँचेस्टर : भारत वि. न्यूझीलंड दरम्यान मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यावेळी ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरुन विमान उड्डाण करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या स्टेडियमला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले होते. भारत -श्रीलंका सामन्यावेळी हेडिंग्ले येथे एका विमानाद्वारे भारतविरोधी फलक झळकावण्यात आला होता. यामुळे येथे विमान उड्डानाला बंदी घालण्यात आली होती.
बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘आम्ही सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याचबरोबर खेळाडूंच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित केला होता.’ बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनीही याला दुजोरा दिला.शनिवारी झालेली घटना आयसीसीनेही गांभीर्याने घेतली होती. या विश्वचषक स्पर्धेत हा प्रकार दुसºयांदा घडला होता. अफगाणिस्तान व पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावेळीही असाच प्रकार घडला होता. ‘बलुचिस्तानला न्याय द्या’ अशा आशयाचे फलक विमानाद्वारे फडकविण्यातआला होता. यामुळे स्टेडियममध्ये व स्टेडियमबाहेरही पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांदरम्यान हाणामारी झाली होती. (वृत्तसंस्था)