नवी दिल्ली : यंदा भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगून माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याने गोलंदाजीचा भार कमी करण्याकडे व्यवस्थापनाने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. जखमांमुळे दीर्घकाळानंतर भुवनेश्वरने भारतीय टी-२० संघात पुनरागमन केले आहे. मागच्या वर्षी आयपीएलदरम्यान भुवनेश्वरच्या जांघेतील मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. यामुळे तो आयपीएल आणि नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळू शकला नाही.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला,‘भुवनेश्वर भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज असल्याने त्याने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्याचा आनंद वाटतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनंतर ज्याला नवा चेंडू आणि डेथ ओव्हरमधील परिस्थिती हाताळता येते, तो गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. नोव्हेंबरमध्ये होणारा विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून भुवनेश्वरवरील गोलंदाजीचा भार मर्यादित ठेवावा लागेल. शंभर टक्के फिट ठेवण्यासाठी त्याच्या गोलंदाजीचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.’ लक्ष्मणच्या मते, इंग्लंडविरुद्ध पाचपैकी किमान दोन टी-२० सामने खेळण्याची भुवनेश्वरला संधी मिळू शकेल. याशिवाय सलामीवीर म्हणून रोहित शर्मासोबत शिखर धवनऐवजी लोकेश राहुल याला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा लक्ष्मणने व्यक्त केली.
भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार
अहमदाबाद : यंदा येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक विजेतेपदाचा भारतीय संघ प्रबळ दावेदार असेल, असे मत इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार जोस बटलर याने व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेत २००७ ला झालेल्या पहिल्या विश्वचषकाचा भारतीय संघ विजेता होता. यंदा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हे आयोजन होईल. ब्रिटिश माध्यमांशी संवाद साधताना बटलर म्हणाला,‘विश्वचषकात यजमान देशाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाऊ शकेल. भारतीय संघ अन्य संघांच्या तुलनेत बलाढ्य वाटतो. मागील काही विश्वचषकात यजमानांनी फार शानदार कामगिरी केली. या प्रकारात मायदेशात खेळणार असल्याने मी भारताला प्रबळ दावेदार मानतो.’बटलर म्हणाला, ‘आम्हाला विश्वचषकासारख्या परिस्थितीशी एकरुप होता येईल. ही मालिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.’