भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घेतली. उजव्या मांडीचे स्नायू अचानक दुखू लागल्यानं त्यानं ही माघार घेतल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शनिवारी जाहीर केलं. त्याच्या जागी संघात बदली खेळाडू म्हणून शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. या मालिकेत भारताला शिखर धवननंतर भुवीच्या रुपानं हा दुसरा धक्का बसला आहे. भुवीनं नुकतेच दुखापतीतून सावरत टीम इंडियात पुनरागमन केले होते आणि आता पुन्हा त्याच्या दुखापतीनं डोकं वर काढले आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भुवीनं उजव्या मांडीचे स्नायू दुखावल्याचं कळवलं होतं. डॉक्टरांनाही त्याच्या दुखापतीचे निदान करता आले नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार सामन्यानंतर भुवी त्वरित वैद्यकिय मदतीसाठी धावला आणि त्यातून त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार भुवीच्या दुखापतीवर आता शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यातून सावरण्यासाठी त्याला किमान दोन महिने विश्रांती करावी लागणार आहे.
''भुवनेश्वर कुमारला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तो संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार आहे. पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला किमान दोन महिने लागतील आणि त्यानंतरच इंडियन प्रीमिअर लीगमधून मैदानावर उतरू शकतो,'' अशी माहिती सूत्रांनी दिली. भुवनेश्वरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागेल का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार त्याला शस्त्रक्रिया करावीच लागेल, पण केव्हा व कधी हे अजून ठरलेलं नाही.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भुवनेश्वरच्या दुखापतीवर नीट उपचार झालेले नाहीत. याआधीही वृद्धीमान साहाच्या दुखापतीबाबत असंच झालं होतं. त्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात आली होती.