भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम बायो बदलले आहे. त्याने त्याच्या बायोमधून 'इंडियन क्रिकेटर' हा शब्द काढून टाकला आहे आणि आता फक्त 'इंडियन' असे लिहिले आहे. या अपडेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याच्या संभाव्य निवृत्तीच्या अफवा पसरल्या आहेत. पण, अशी कोणतीच घोषणा भुवीने केलेली नाही.
आपल्या उत्कृष्ट स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला भुवनेश्वर कुमार सध्या ३३ वर्षांचा आहे. जानेवारी २०२२ मध्ये तो भारताकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे आहे. ऑगस्टच्या उत्तरार्धात भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी अटकळ आहे.
BCCI ने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारातील खेळाडूंच्या यादीत, भुवनेश्वर कुमारचे नाव वगळले गेले होते. तो २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचा सदस्य नसेल, अशी शक्यता आहे. भुवनेश्वरने भारतासाठी ८७ ट्वेंटी-२०, १२१ वन डे आणि २१ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने एकूण २९४ विकेट्स घेतल्या आहेत ज्यात सातवेळा पाच बळींचा समावेश आहे.