नवी दिल्ली : आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अष्टपैलू हार्दिक पांड्या सामन्याचा हीरो ठरला, पण यादरम्यान एक असा खेळाडू आहे, ज्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि त्यांना सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. तो म्हणजे ‘स्विंग किंग’ भुवनेश्वर कुमार.भुवनेश्वर कुमारसाठी गेली एक-दोन वर्षे फारशी चांगली गेली नाहीत. कारण या काळात तो दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. क्रिकेटशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही भूकंप आला, कारण त्याच्या वडिलांचेही याच काळात निधन झाले.
अशा परिस्थितीत त्याच्या टी-२० क्रिकेटमधील भविष्यावर प्रश्न निर्माण होऊ लागले होते. मात्र यानंतर भुवनेश्वरने दमदार पुनरागमन केले. आयपीएल २०२२ मध्ये त्याने १२ गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली होती. सुरुवातीला गडी बाद करून देणारा भुवी ‘डेथ ओव्हर स्पेशालिस्ट’देखील बनला. त्याने टीम इंडियातही पुनरागमन केले. पुनरागमन झाल्यापासून त्याने भारतीय गोलंदाजांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. भुवनेश्वर कुमार ज्याप्रकारे टी-२० मध्ये शानदार कामगिरी करत आहे, ते पाहता त्याचा टी-२० विश्वचषकासाठीचा दावा भक्कम होत आहे. जसप्रीत बुमराह परतल्यावर या दोघांची जोडी विरोधकांसाठी कर्दनकाळ बनू शकते.
भुवनेश्वरला आयपीएल २०२० दरम्यान दुखापत झाली होती, तो संपूर्ण सत्र योग्य प्रकारे खेळू शकला नाही. त्यानंतर तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहिला, फॉर्ममध्ये नसल्यामुळे टी-२० संघातूनही त्याला डच्चू मिळाला होता. भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंग यांचे आयपीएल २०२१ दरम्यान निधन झाले. ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. नोएडामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडिलांच्या उपचारासाठी त्याने आयपीएलदेखील मध्येच सोडले होते.