Bhuvneshwar Kumar, Asia Cup 2022 IND vs AFG: भारतीय संघाचा रनमशिन विराट कोहली याने अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी धुलाई केली. त्याने तब्बल तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर धडाकेबाज शतक ठोकत भारताला २००पार आकडा गाठून दिला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा स्विंगचा बादशाह भुवनेश्वर कुमार याने अफगाणिस्तानच्या फलंदाजांचे अक्षरश: कंबरडे मोडले. भुवनेश्वर कुमारने पॉवर-प्ले मध्ये गोलंदाजी केली आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. त्याने पॉवर-प्ले च्या ३ षटकांमध्ये ४ धावांत ४ बळी टिपले होते. त्यानंतर चौथे षटक निर्धाव टाकत पाचवा बळी टिपला. भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पळता भुई थोडी झाली.
--
--
त्याआधी, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेतल्याने, कर्णधार लोकेश राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली यांनी सलामीला उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय एकदम 'हिट' ठरला. रोहितच्या अनुपस्थितीत विराट-राहुल जोडीने शतकी सलामी देत आपापली अर्धशतके पूर्ण केली. विराट कोहलीने आशिया चषकाच्या यंदाच्या हंगामात हाँगकाँग आणि पाकिस्ताननंतर आज तिसरे अर्धशतक ठोकले. तर फॉर्मसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला देखील सूर गवसला. विराटच्या साथीने त्याने दमदार अर्धशतक ठोकत संघाला रोहितची उणीव अजिबात भासू दिली नाही. राहुल ४२ चेंडूत ६१ धावांवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. सूर्यकुमार यादव (६) स्वस्तात बाद झाला. पण विराटने मात्र २० षटके पूर्ण खेळून काढली. त्याने ६१ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा कुटल्या. रिषभ पंतनेही (नाबाद २०) विराटला शेवटपर्यंत साथ दिली.
विराटने शतक केलं पत्नी-लेकीला समर्पित!
"गेल्या तीन वर्षांपासून मी शतकाच्या प्रतिक्षेत आहे. आज मी ठोकलेलं शतक सेलिब्रेशन करण्याजोगं आहे की नाही, याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. पण आजचं शतक हे माझ्यासाठी खूपच खास आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांनी मला खूप काही शिकवलं. नशीबाची साथ आणि भूमिका किती महत्वाची असते, याची मला पूरेपुर प्रचिती आली. त्यामुळेच आजचं हे शतक मी माझी पत्नी अनुष्का आणि माझी मुलगी वामिका हिला समर्पित करतो. अनुष्का माझ्या कठीण काळात माझ्या पाठिशी उभी राहिली होती. मी आज जो काही कणखरपणे उभा आहे त्याला अनुष्काचेच पाठबळ आहे. अनुष्कामुळे मी सकारात्मकतेने खेळत राहिलो आणि आज त्याचं मला फळ मिळालं, असे विराट म्हणाला.
Web Title: Bhuvneshwar Kumar swings match to Team India side with taking 5 wickets in 4 Runs Afghanistan batting tumble down
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.