भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दम दाखवतोय आणि तिथे सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत स्वींग मास्टर भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भुवीने आज कर्नाटकविरुद्धच्या लढतीत डेथ ओव्हरमध्ये ९ चेंडूंत ५ विकेट्स घेऊन संघाला विजय मिळवून दिला.
उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १९६ धावा चोपल्या. सलामीवीर अभिषेक गोस्वामीने ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. नितिश राणाने ४० धावा केल्या. रिंकू सिंगने १६ चेंडूंत नाबाद ३१ आणि ध्रुव जुरेलने ११ चेंडूंत नाबाद २५ धावा चोपून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात, कर्नाटककडून कर्णधार मयांक अग्रवालने ३५ चेंडूंत ५९ धावा चोपल्य. त्यात ८ चौकार व २ षटकार होते. बी आर शरथने १८ चेंडूंत २६ धावा केल्या. मनिष पांडे ( ११), एमएस भांडगे ( १३), अभिनव मनोहर ( १३) आणि के गौथम ( १५*) यांनी योगदान दिले.
पण, भुवनेश्वरने डेथ ओव्हरमध्ये कर्नाटकचे कंबरडे मोडले. त्याने ९ चेंडूंत ५ विकेट्स घेत कर्नाटकचा डाव १८.३ षटकांत १५६ धावांवर गुंडाळला आणि संघाला ४० धावांनी विजय मिळवून दिला. भुवीने ३.३ षटकांत १६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यश दयालने २, तर मोहसिन खान, शिवा सिंग व जस्मेर धनकर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भुवीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
भुवनेश्वरने २१ कसोटी, १२१ वन डे व ८७ ट्वेंटी-२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ६३, १४१ व ९० विकेट्स घेतल्या आहेत. २०१८मध्ये तो शेवटची कसोटी मॅच खेळला होता. २०२२च्या दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौऱ्यानंतर तो भारतीय संघाच्या वन डे व ट्वेंटी-२० संघातूनही बाहेर आहे.
Web Title: Bhuvneshwar Kumar took five wickets in just nine balls in the death overs against strong Karnataka in a must-win game for Uttar Pradesh, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.