बर्मिंगहॅम : ‘इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांमध्ये केलेल्या प्रभावी गोलंदाजीचा मला आनंद आहे. पण, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास माझ्याकडून चेंडू कशाप्रकारे स्विंग होत आहे, हे मलाच माहीत नाही,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने दिली. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये भुवीने आपल्या शानदार स्विंग माऱ्याने यजमानांच्या फलंदाजीला हादरे दिले.
इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारताने शनिवारी २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भुवीशी संवाद साधला असताना, त्याने म्हटले की, ‘चेंडू स्विंग कसा होतोय हे मलाही माहीत नाही. कारण मी येथे अनेकदा आलोय आणि खेळलोय. मी गेल्यावेळी येथे ज्या मालिका खेळलो, त्यामध्ये चेंडू फारसा स्विंग झाला नव्हता. त्यामुळे, आता चेंडू स्विंग होत असताना मलाही आश्चर्य वाटले. खेळपट्टीवर उसळी अधिक आहे. त्यामुळे जेव्हा चेंडू स्विंग होतो, तेव्हा अधिक आनंद मिळतो.’
भुवी पुढे म्हणाला की, ‘पण, एक मनापासून सांगतो की, खरंच मलाही माहीत नाही चेंडू स्विंग कसा होतोय. परिस्थितीमुळे असे होत असेल किंवा चेंडूमुळे. पण एक गोष्ट नक्की की, याचा मला आनंद होत आहे. चेंडू स्विंग होत असल्याचा फायदा घेऊन मी आक्रमक मारा करण्याचा प्रयत्न करत राहणार. कारण हीच माझी ताकद आहे. सपाट खेळपट्ट्यांवर फलंदाज आक्रमण करतात; पण चेंडू स्विंग होत असताना मी आक्रमण करतो.’
पुनरागमन केल्यापासून केलंय प्रभावित
भुवीने दुखापतीतून पुनरागमन केल्यापासून सर्वांना प्रभावित केले आहे. याविषयी त्याने सांगितले की, ‘दुखापतीतून पुनरागमन करताना तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागते. याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. पुनरागमनासाठी किमान एक संधी तरी मिळणारच, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यावेळी मी पूर्ण योगदान देईन; पण निकाल काय मिळणार याची शाश्वती नसते. दुखापतीनंतर प्रत्येकजण निराश होतो. पण, अशा स्थितीत मानसिकरीत्या कणखर बनणे महत्त्वाचे ठरते.’
Web Title: Bhuvneshwar Kumar very surprised to see white ball swing for long india england t20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.