Bhuvneshwar Kumar wife Nupur Nagar, IND vs AUS: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या टीकाकारांच्या आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली टी२० सामन्यात भुवी भारतीय संघाला चांगलाच महागात पडला. याच कारणामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. भुवीला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता त्याची पत्नी नुपूर नागर भुवनेश्वरच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. नुपूरने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत त्याच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.
भुवनेश्वरची पत्नी नुपूर हिने आपल्या इस्टाग्रामवर स्टोरीवरून टीकाकारांना चांगलंच सुनावले. आजकाल लोकं खूपच रिकामटेकडे झालेत. लोकांकडे काहीच काम नसतं. त्यामुळे अशी रिकामटेकडी लोकं केवळ समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतात आणि भावना दुखावण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना माझा एक सल्ला आहे की तुमच्या असल्या टीकांना किंवा शब्दांना आम्ही घाबरत नाही. तुमच्या शिव्या-शापांनी आमचं काहीही बिघडणार नाही. त्यामुळे अशा टीकाटिप्पणी करण्यापेक्षा स्वत:ला अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न करत राहा आणि त्यासाठी तुमची ऊर्जा खर्च करा, कारण तुमच्या वाईट शब्दांतील टीकेचा कोणावरही काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत नुपूरने आपला राग व्यक्त केला.
भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये खूप धावा दिल्या आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये, त्याने १९ व्या षटकात १६ धावा दिल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने २०९ धावांचे विक्रमी लक्ष्याचा पाठलाग केला आणि विजयाची नोंद केली.
सुनील गावसकरांनीही भुवीला केलं टीकेचं लक्ष्य
"मान्य करा की आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. उदाहरणच द्यायचं तर १९व्या षटकात फार धावा गेल्या. तोच खरा चिंतेचा भाग आहे. जेव्हा भुवनेश्वर कुमारसारखा अनुभवी गोलंदाज शिस्तबद्ध गोलंदाजीची अपेक्षा असताना भरपूर धावा देतो, तेव्हा ती बाब चिंता करण्यासारखीच असते. गेल्या तीन सामन्यात त्याने १९वे षटक टाकले आहे. त्याने एकूण १८ चेंडूंमध्ये तब्बल ४९ धावा दिल्या. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या फलंदाजांनी त्याला कुटून काढले. याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे. भुवनेश्वर कुमार सारखा गोलंदाज १८ चेंडूत जास्तीत जास्त ३५-३६ धावा देईल अशी कोणत्याही संघाला अपेक्षा असते. पण तसं घडत नाही. तो अक्षरश: धावा लुटू देतो. अशाप्रकारे गोलंदाजी केली तर सामने जिंकणे खरंच खूप कठीण होऊन बसेल", असे अतिशय गंभीरपणे सुनील गावसकर म्हणाले.