भारताचा क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) याच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. मेरठ येथील गंगानगर सी पॉकेट येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भुवनेश्वर कुमारचे वडील किरनपाल सिंह हे पोलीस विभागात काम करत होते आणि त्यांनी व्हीआरएस घेतला होता. ते ६३ वर्षांचे होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना यकृताचा आजार होता आणि काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. डॉक्टरांनी आशा सोडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना आपल्या घरी आणले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना दिल्लीतील एम्स व नॉयडातील एका हॉस्पिटलवर उपचार केले गेले. दिल्ली व नॉयडा येथे त्यांच्यावर किमो थेरेपी करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांना वाटत होते.
पण, दोन आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना गंगानगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांना मुजफ्फरनगर येथील मसूरीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. यकृताच्या समस्येमुळे त्यांना कावीळ व अन्य आजरही झाले. त्यानंतर डॉक्टरांनी हार मानली.
भुवीनं 21 कसोटींत 63 विकेट्स घेतल्या आहेत. 82 धावांत 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावावर 552 धावांसह 3 अर्धशतकं आहेत. 117 वन डे व 48 ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं अनुक्रमे 138 व 45 विकेट्स घेतल्या आहेत.