टीम इंडियातील दोन प्रमुख शिलेदार हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीतून सावरण्यासाठी लंडनला गेले होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पांड्या मायदेशी परतला, तर बुमराहची दुखापत गंभीर नसल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली नाही. या वर्षी तरी या दोघांचे कमबॅक होणार नसले तरी ते लवकरच पुन्हा मैदानावर दिसतील. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, त्याचवेळी टीम इंडियाचे चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. टीम इंडियाचा आणखी एक प्रमुख गोलंदाज मागील काही महिन्यांपासून जायबंदी आहे आणि त्याच्या पुनरागमनाचा मुहूर्त काही ठरत नाही.
ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताचा हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आपण भुवनेश्वर कुमार बद्दल बोलत आहोत. विंडीज दौऱ्यानंतर तो बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. पण, त्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अजूनही कोणतिही अधिकृत माहिती देत नाही. पण, एक इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार भुवनेश्वर अजूनही पुर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याच्या मांडीचे स्नायू अजूनही ताणले गेलेले आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतून भुवनेश्वरला का दूर ठेवण्यात आले, याबाबत निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांनाही समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. आफ्रिकेविरुद्धचा ट्वेंटी-20 संघ निवडताना तो उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पुनर्वसन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भारताचा कसोटी संघाचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहा याला अशाच प्रकारे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात गेल्यानंतर दीड वर्ष क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. साहासह पृथ्वी शॉ याच्याबाबतीतही असेच घडले. ''जर भुवनेश्वर कुमारची दुखापत गंभीर नाही, तर त्याला कमबॅक करण्यात इतका वेळ का लागतोय, याची माहिती द्यावी. जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांच्या दुखापतीबाबत बीसीसीआयनं माहिती दिली. तशीच भुवनेश्वरबाबतही द्यावी,''असे एका अधिकाऱ्यानं सांगितले. मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यापासूनच भुमराह दुखापतीशी झगडत आहे.