मुंबई : निदाहास ट्रॉफीतील अंतिम सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार खेचत भारताला जेतेपद मिळवून दिले. कार्तिकवर त्यावेळी स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. बॉलीवूडचे महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चनही यावेळी मागे नव्हते. त्यांनीही कार्तिकचे अभिनंदन केले. पण यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे त्यांनी कार्तिकची मनापासून माफीही मागितली. काय होती ही चूक, आपण जाणून घेऊया.
बांगलादेशविरुद्धच्या अंतिम फेरीत कार्तिकने अफलातून खेळी साकारली. त्यावर अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, " दिनेश कार्तिक, तू आमच्यासाठी खास व्यक्ती ठरला आहेस. एक शानदार विजय तू आम्हाला मिळवून दिला. अखेरच्या दोन षटकांमध्ये भारताला 24 धावा हव्या होत्या. त्यावेळी अखेरच्या चेंडूवर तू षटकार खेचलास... ही गोष्ट अतुलनीय अशीच आहे. विजयाच्या शुभेच्छा. "
हे पहिले ट्विट त्यांनी 11 वाजून 38 मिनिटे असताना केले होते. पण यामध्ये त्यांनी चुकीचा तपशिल लिहीला होता. भारताला अखेरच्या दोन षटकांमध्ये विजयासाठी 34 धावांची गरज होती. अमिताभ यांनी हे ट्विट केल्यावर समाजमाध्यमांवर त्यांना ट्रोल केले जात होते. आपली ही चूक अखेर त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांनी दुसरे ट्विट केले. या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी कार्तिकची सपशेल माफी मागितली आहे.