Join us  

पैसा वसूल; सनरायझर्स हैदराबादच्या नव्या भिडूची षटकारांची आतषबाजी

big bash league : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) लिलावात सनरायझर्स हैदराबादनं दोन कोटींत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला आपल्या ताफ्याल दाखल करून घेतले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 6:35 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) लिलावात सनरायझर्स हैदराबादनं दोन कोटींत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला आपल्या ताफ्याल दाखल करून घेतले होते. मार्शनं बिग बॅश लीगमध्ये शनिवारी पैसा वसूल खेळी करताना प्रतिस्पर्धी मेलबर्न रेनेगॅडेस संघांच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पर्थ स्कॉचर्स संघानं 7 बाद 196 धावांचा डोंगर उभा केला. सनरायझर्स हैदराबाद संघानंही आपल्या नव्या भिडूच्या खेळीचं तोंडभरून कौतुक केलं.

प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सच्या लिएम लिव्हिंगस्टोन आणि जोश इंग्लीस या सलामीवीरांना साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, कॅमेरून बँक्रॉफ्ट व अॅश्टन टर्नर यांनी दमदार खेळ केला. बँक्रॉफ्टनं 37 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 51 धावा जोडल्या. टर्नरने 26 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 36 धावा केल्या. त्यानंतर मार्शच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. मार्शनं 22 चेंडूंत 1 चौकार व 6 षटकारांचा अतषबाजी करताना नाबाद 56 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघानं 196 धावांपर्यंत मजल मारली. 

लक्ष्याचा पाठलाग करताना शॉन मार्श आणि बीयू बेवस्टर यांनी तुफान फटकेबाजी करून तोडीसतोड उत्तर दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अॅरोन फिंच ( 28) आणि सॅम हार्पर ( 15) हे त्वरित माघारी परतले. पण, त्यानंतर शॉन मार्शनं तुफान खेळी केली. 38 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकार लगावताना त्यानं 55 धावा केल्या. त्याला बीजे वेबस्टरची तोडीसतोड साथ मिळाली. पण, फवाद अहमदनं मार्शला बाद केल्यानंतर मेलबर्न संघाचा डाव गडगडला. वेबस्टरनं 37 चेंडूंत  4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 67 धावा केल्या. मेलबर्न संघाला 6  बाद 185 धावांपर्यंत मजल मारता आली आणि पर्थ स्कॉचर्स संघानं 11 धावांनी विजय मिळवला. 

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादआयपीएल 2020आॅस्ट्रेलिया