ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग स्पर्धांची धूम सुरू आहे. या स्पर्धेत कायमच चांगले वाईट प्रसंग घडत असतात. नुकताच या स्पर्धेत अॅडलेड स्ट्रायकर्स विरूद्ध सिडनी थंडर असा सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात वेगवान गोलंदाज डॅनियल वॉरल याने टाकलेला एक चेंडूत थेट ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू बेन कटींगच्या हेल्मेटवरच बसला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. पण त्यानंतर जे काही घडलं ते नेहमीपेक्षा वेगळंच होतं.
थंडर्सकडून सलामीला आलेला बेन कटींग फलंदाजी करत होता. तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज वॉरलने एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. चेंडू अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेऊन थेट कटींगच्या हेल्मेटवरच आदळला. चेंडू वेगवान होता त्यामुळे कटींगला इजा तर झाली नाही ना ते पाहण्यासाठी वॉरल लगबगीने त्याच्या दिशेने जात होता. तितक्यात कटींग पटकन उठून उभा राहिला आणि त्याने वॉरलकडे पाहून 'थंप्स अप' करून मी ठीक आहे असा संदेश दिला. त्याच्या या खिलाडीवृत्तीचं साऱ्यांनीच कौतुक केलं.
पाहा नक्की काय घडलं...
घडलेल्या प्रकारानंतर कटींग १०व्या षटकापर्यंत फलंदाजी करत होता. ३७ चेंडूत ३२ धावा काढून तो बाद झाला. जेसन संघाच्या ५५ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर थंडर्स संघाने २० षटकात १८७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्रायकर्सचा संघ १६५ धावांतच बाद झाला. त्यामुळे थंडर्स संघाचा २२ धावांनी विजय झाला.