2019चा वर्ल्ड कप आठवला जाईल तो चौकाराच्या विवादास्पद नियमामुळे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याचा निकाल हा सर्वाधिक चौकारावर लावण्यात आला होता. पण, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्वेंटी-20 लीगने हा नियम बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्यात लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना रंगला होता. त्यात न्यूझीलंडच्या 8 बाद 241 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांत तंबूत परतला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने 15 धावांचे लक्ष्य दिले आणि न्यूझीलंडनं 1 बाद 15 धावा केल्या. पण, सर्वाधिक चौकारांच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या निर्णयावर सडकून टीका झाली. या नियमावर चर्चा केली जाईल, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी जॉफ अॅलार्डीक यांनी सांगितले. आयसीसीची पुढील बैठक 2020 वर्षाच्या सुरुवातीला होईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मंगळवारी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. अंतिम सामना निर्धारित षटकांत आणि सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत सुटल्यास निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, असे ठाम मत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं व्यक्त केलं. पुरुष व महिला ट्वेंटी-20 लीगसाठी हा नियम असेल. हा नियम केवळ अंतिम सामन्यापूरता असेल, साखळी सामन्यात सुपर ओव्हरमध्ये निकाल न लागल्यास दोन्ही संघांना गुण विभागून दिले जातील.
याबाबत मॉर्गन म्हणाला की, “ विश्वचषकात आम्ही सर्वात चांगला सामना खेळलो तो उपांत्य फेरीचा. या सामन्यात आमच्याकडून सांघिकरीत्या दर्जेदार खेळ झाला होता. पण अंतिम फेरीत मात्र आम्ही फेव्हरीट नव्हतो. काही काळ आम्ही सामन्यावर वर्चस्व राखले. पण या सामन्यात जास्त काळ न्यूझीलंडचा संघ फेव्हरेट होता.“