नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर बनविण्याच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवागने आपले मत प्रदर्शित केेले आहे. भारताच्या या माजी सलामीवीराच्या मते, धोनीला भारतीय संघाचा मेंटॉर बनविल्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण सेहवागच्या मते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनी गोलंदाजांसाठी एक उपयुक्त कर्णधार ठरला आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा गोलंदाजांना वेळोवेळी फायदाच झाला आहे. (Big benefit of Dhoni's mentorship says virendra Sehwag)
सेहवाग म्हणतो की, ‘धोनीने भारतीय संघाचा मेंटॉर होण्याचा बीसीसीआयचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर मी खूप खुश झालो. मला माहिती आहे भारतातील खूप लोकांना असे वाटते की, धोनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये परत यावा. त्यामुळे मेंटॉरच्या रूपात त्याचे होणारे हे दर्शन अनेकांना सुखावणार आहे.’
जवळपास एक दशक धोनीसोबत खेळल्याने सेहवागला धोनीच्या कर्तृत्वाची पुरेपूर जाण आहे. गोलंदाजांच्या मानसिकेताबाबत धोनीला किती माहीत असते हे सेहवागने अगदी जवळून पाहिले आहे.
सेहवाग पुढे म्हणाला की, ‘एक विकेटकीपर असताना धोनीचे क्षेत्ररक्षण लावण्याचे कसब असामान्य होते. त्याचा हा गुण या विश्वचषकात भारताला महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यत्वेकरून गोलंदाजांना धोनीच्या या गुणाचा जास्त फायदा होणार आहे. धोनीच्या मदतीने भारतीय गोलंदाज एखाद्या फलंदाजाविरुद्ध योजना आखू शकतात.’
सेहवागने यावेळी धोनीच्या नवीन वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. सेहवाग म्हणाला, ‘जे खेळाडू थोडे अबोल असतात, थोडे लाजाळू असतात त्यांना धोनीचा निश्चितच फायदा होऊ शकतो. अशा खेळाडूंसाठी धोनी सर्वोत्तम मेंटॉर आहे. खासकरून जेव्हा एखादा खेळाडू मैदानावर स्वत:ला नीट व्यक्त करू शकत नाही. जेव्हा त्याला मार्गदर्शनाची गरज असते; पण तो सांगू शकत नाही. तेव्हा अशांसाठी धोनी उपयोगाचा ठरू शकतो. खेळाडूंसाठी धोनी संकटमोचक आहे. तो असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत खेळाडू मनमोकळा संवाद साधू शकतात. कर्णधाराला न सांगू शकणाऱ्या गोष्टी खेळाडू धोनीकडे बोलू शकतात.’
टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात बदल होऊ शकतात सेहवागच्या मते टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यांच्या संघात बदल होऊ शकतात. जर काही खेळाडू येत्या आयपीएलमध्ये चमकले, तर त्यांचा भारताच्या संघासाठी विचार केला जाऊ शकतो. कारण १० ऑक्टोबरपर्यंत संघ बदलण्याची मुभा आयसीसीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सेहवागच्या म्हणण्यानुसार प्रत्येक संघासाठी आयपीएलचे सात सामने शिल्लक आहेत. याचा अर्थ प्रत्येक खेळाडूला आपली कामगिरी दाखविण्यासाठी सात सामने मिळणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना प्रत्येक सामन्यात त्यांचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. अशा खेळाडूंवर निवड समितीही नजर ठेवून असेल.
Web Title: Big benefit of Dhoni's mentorship says virendra Sehwag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.