Cameron Green, chronic kidney disease, IPL 2024 : या स्पर्धेसाठी लवकरच लिलाव होणार आहे. त्याआधी झालेल्या काही आदलाबदलीमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन याला RCB ने १७.५० कोटींना मुंबई इंडियन्सकडून विकत घेतले. गेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांची बोली लावून ग्रीनला विकत घेतले होते. यंदा मुंबईने हार्दिक पांड्याचा समावेश केला आणि ग्रीनला रिलीज केले. त्यामुळे यंदा तो RCBच्या ताफ्यात दाखल झाला आहे. पण तशातच RCB आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅमेरॉन ग्रीन हा गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे त्यानेच सांगितले आहे.
नक्की काय झालाय आजार?
कॅमेरून ग्रीन काही काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. कॅमेरॉन ग्रीनने खुलासा केला आहे की त्याला क्रोनीक किडनी आजार (Chronic Kidney Disease) आहे. जन्मजात त्याला मूत्रपिंडाचा आजार आहे. सुरूवातीला तो केवळ १२ वर्षे जगू शकेल असे सांगितले जात होते, पण त्याने काही अंशी यावर मात केली. '7 क्रिकेट'ला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरूनने सांगितले की, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच मला किडनीचा गंभीर आजार आहे असे सांगितले होते. पण मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. पण नुकत्याच झालेल्या अल्ट्रासाऊंड तपासणीत मला याची लक्षणे जाणवली आणि ही माहिती मिळाली.
कॅमेरॉन ग्रीनला असलेला 'क्रोनिक किडनी डिसीज' म्हणजे काय?
ग्रीन म्हणाला, 'क्रोनिक किडनी डिसीज हा मुळात तुमच्या किडनीवर परिणाम करत असतो. दुर्दैवाने, यात किडनी रक्त आणि इतर गोष्टी नीट फिल्टर करत नाही. मला सध्या यातील स्टेज 2 चा आजार आहे. त्यामुळे माझी किडनी सध्या केवळ सुमारे 60% रक्तच फिल्टर करू शकते. पण मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो की असा आजार असूनही मला इतरांच्या एवढा या गोष्टीचा त्रास होत नाही.
पुढे तो म्हणाला की, 'क्रोनिक किडनी डिसीजचे पाच टप्पे आहेत, स्टेज 1 हा सर्वात कमी गंभीर आहे आणि स्टेज 5 मध्ये ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस आवश्यक आहे. सुदैवाने मला स्टेज 2 चा त्रास आहे. जर तुम्ही किडनीची पुरेशी काळजी घेतली नाही तर ती आणखी वाढतो. मूत्रपिंड बरे होऊ शकत नाही, ट्रान्सप्लांटही होऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच सर्वोत्तम व एकमेव पर्याय आहे.'