IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करतोय. काल त्यांची घरच्या मैदानावर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( SRH vs CSK) पराभूत केले. चारपैकी दोन सामने जिंकून ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली होती. त्यांच्या वाट्यात काटा आला आहे. त्यांच्या संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga ) हा आयपीएल २०२४ मध्ये भाग घेणार नाही.
लेग-स्पिनर दुखापतग्रस्त आहे आणि या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही, असे श्रीलंका क्रिकेट (SLC) ने पत्र लिहून तसे BCCI ला कळवले आहे. आता फ्रँचायझी हसरंगाची रिप्लेसमेंट शोधत आहे. सूत्रांनुसार, SLCने बीसीसीआयला पत्र लिहून सांगितले आहे की, ''२६ वर्षीय खेळाडूला डाव्या पायाचा घोटा बरा करण्यासाठी पुनर्वसन आणि विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे तो आयपीएल २०२४ हंगामासाठी उपलब्ध नसेल. दुबईतील वैद्यकिय तज्ञाने त्यांला विश्रांतीचा सल्ला दिला होता.''
व्यवस्थापक श्याम यांनी क्रिकबझला सांगितले की, "श्रीलंका क्रिकेटने बीसीसीआयला पत्र लिहून त्याच्या अनुपलब्धतेबद्दल कळवले आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी तो दुबईला गेला होता आणि तिथे तीन दिवस थांबला होता. सध्याची परिस्थिती पाहता त्याने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सहभागी होण्यापेक्षा विश्रांती घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे."
हसरंगाची पूर्वीची किंमत १०.७५ कोटी होती आणि RCB ने त्याला रिलिज केल्यानंतर आयपीएल लिलावात हैदराबादने १.५ कोटीच्या मूळ किंमतीत त्याला संघात घेतले होते