Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरु होण्याआगोदर भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. बुमराहने अलीकडेच त्याच्या पाठीचे स्कॅन करण्यासाठी बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सला भेट दिली. त्यानंतर त्याच्या फिटनेसबाबत विविध अंदाज लावले जात होते, पण अखेर BCCI ने अधिकृतरित्या घोषणा करून भारतीय चाहत्यांना ही वाईट बातमी दिली. याशिवाय भारताच्या संघात बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाला (Harshit Rana) संधी देण्यात आली आहे.
बुमराह अजूनही 'अनफिट'
इएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही, ज्यामुळे तो २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. बंगळुरूमध्ये केलेल्या बुमराहच्या स्कॅनमध्ये काहीही असामान्य आढळले नसले तरी, तो अद्याप गोलंदाजी करण्यास पूर्णपणे सज्ज नाही. काही आठवड्यात तो धावण्यास सुरुवात करेल आणि नंतर हळूहळू गोलंदाजी करण्यास सुरुवात करेल अशी शक्यता आहे. तोपर्यंत बीसीसीआयची वैद्यकीय टीम बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवेल.
टीम इंडियाला संघात बदल करावा लागला
१८ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय संघात बुमराहचा समावेश होता. पण आता बीसीसीआयला टीम इंडियामध्ये बदल करावा लागला. बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही बुमराहचा बॅक-अप म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. या मालिकेदरम्यान हर्षित राणानेही वनडे पदार्पण केले.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जाडेजा, वरुण चक्रवर्ती.
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे.