जोहान्सबर्ग : वेगवान गोलंदाज एन्रिच नोर्खिया दुखापतग्रस्त बनल्याने भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. या दुखापतीमुळे नोर्खिया भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (सीएसए) अद्याप त्याच्या दुखापतीबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. तसेच, कसोटी संघात त्याच्याजागी इतर कोणत्याही खेळाडूची अजून निवडही करण्यात आलेली नाही. एन्रिच नोर्खियाने दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने ४७ बळी घेतले आहेत. त्याने तीनवेळा पाच बळी घेण्याची कामगिरीही केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेला २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथून सुरुवात होईल.
सीएसएने माहिती दिली की, हा वेगवान गोलंदाज सातत्याने दुखापतींचा सामना करत असल्याने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. दुर्दैवाने तो कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज म्हणून तंदुरुस्ती सिद्ध करण्यात अपयशी ठरला. दुखापतीतून सावरण्यासाठी नोर्खिया विशेषतज्ज्ञांची मदत घेत आहे. अद्याप त्याच्याजागी संघात इतर खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. आयपीएलमध्ये नोर्खियाने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांनाच प्रभावित केले होते. या जोरावरच दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला रिटेन केले आहे.