भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना ११३ धावांनी जिंकला. यासोबतच भारताने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. त्यामुळे भारतीयांची वर्षअखेर गोड झाली असं म्हणेपर्यंतच एक वाईट बातमी आली. भारतीय संघाने कसोटी सामन्यात षटकांची गती कमी राखल्यामुळे भारतीय संघाला सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली आहे. ICC ने ही कारवाई केली. तसेच, या कारवाईमुळे भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतदेखील एक गुण गमवावा लागला आहे.
भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. मात्र भारतीय संघाने निर्धारित वेळेत षटकं न टाकल्याचे निरिक्षण सामनाधिकाऱ्यांनी नोंदवले. त्यामुळे ICC ने भारतीय संघावर दंडात्मक कावाई केली. तसेच, भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही फटका बसला. षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी भारतीय संघाला WTC मधील एक गुण गमवावा लागला.
ICC च्या आचारसंहितेतील नियम 16.11 नुसार एखाद्या संघाने जर निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले तर त्या संघाचा एक गुण वजा केला जातो. भारतीय संघानेही एक षटक कमी टाकल्यामुळे भारताच्या खात्यातून एक गुण वजा करण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहली षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी चूक मान्य केल्यामुळे भारताला अधिकृत सुनावणीला सामोरं जावं लागलं नाही. पंच मॅरिस इरॅस्मस, एड्रीयन होल्डस्टॉक, अल्लाउद्दीन पालेकर आणि बोनगानी जेले यांनी भारतीय संघाविरोधात षटकांची गती कमी राखल्याचे निरिक्षण नोंदवले होते.