Virat Kohli Yashasvi Jaiswal, ICC Test Rankings 2024: जागतिक कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. बुधवारी ICCने जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत बाबर आझमची चक्क सहा स्थानांनी घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर गेला आहे. तर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांना क्रमवारीत बढती मिळाली आहे. बाबर आझमच्या घसरणीचे कारण म्हणजे रावळपिंडी येथे नुकताच झालेला कसोटी सामना. या कसोटी सामन्यात बाबरने पहिल्या डावात शून्य धावा आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या. या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव झाला.
विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांना मात्र लॉटरी लागली. एकही कसोटी सामना न खेळता दोघांचा मोठा फायदा झाला. ताज्या क्रमवारीत विराट कोहलीने आता २ स्थानांची प्रगती करत आठव्या क्रमांक गाठला आहे. यशस्वी जैस्वालनेही एका स्थानाची बढती मिळवत सातवे स्थान पटकावले आहे. या फॉरमॅटमध्ये जो रूट ८८१ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. हॅरी ब्रूकने ३ स्थानांची झेप घेत चौथा क्रमांक पटकावला आहे. मोहम्मद रिझवानने शतक झळकावून सात स्थानांनी झेप घेत टॉप-१० मध्ये धडक मारली आहे. तसेच पाकिस्तानचा उपकर्णधार सौद शकील शतकामुळे एका स्थानाच्या बढतीसह १३व्या स्थानी पोहोचला आहे. बांगलादेशचा मॅचविन मुशफिकुर रहीमने सात स्थानांनी झेप घेत १७वे स्थान मिळवले आहे.
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानावर कायम आहे. फिरकीपटू प्रभात जयसूर्याने मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच विकेट्स घेत एक स्थानाची बढती घेऊन नववे स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स चार स्थानांनी वर येत १६ व्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा असिथा फर्नांडो १० स्थानांची झेप घेऊन १७ व्या स्थानी आला आहे. तर पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाह चार स्थानांच्या बढतीसह ३३व्या स्थानी आहे.
ख्रिस वोक्सनेही कसोटी अष्टपैलूंच्या यादीत एका स्थानाची बढती मिळवत आठवे स्थान पटकावले आहे. या यादीत भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा अव्वलस्थानी कायम आहे.
Web Title: Big blow to Babar Azam in ICC Test rankings Virat Kohli Yashasvi Jaiswal promoted in rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.