Deepak Chahar, IPL 2022: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे कर्णधारपद सोडल्यापासून त्यांच्या अडचणी काही केल्या संपतच नाहीयेत. CSK ने पहिले चारही सामने गमावले. त्यानंतर आता त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. इएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू दीपक चहर हा संपूर्ण आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. हंगामातील चार सामने खेळून झाल्यावरही अद्याप चेन्नईला एकही विजय मिळवता आलेला नाही. दीपक चहरशिवाय संघाच्या वेगवान गोलंदाजीत हवा तो प्रभाव दिसत नाही. अशा स्थितीत दीपक चहरचे तंदुरूस्त नसणे हा CSK साठी मोठा धक्का मानला जात आहे.
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब ट्रीटमेंट घेत असताना दीपक चहरच्या पाठीला दुखापत झाल्याचे समजले आहे. त्यामुळे दीपक चहरचे आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता अधिक संशयास्पद आहे. दुखापती किती गंभीर स्वरूपाची आहे, याबाबत चेन्नई सुपर किंग्सला 'बीसीसीआय'कडून अद्याप औपचारिक अहवाल मिळालेला नाही.
दीपक चहर गेल्या महिन्याभरापासून NCA मध्ये आहे. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या भारताच्या T20 मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. एनसीए फिजिओच्या प्राथमिक अंदाजानुसार, दीपक चहर आयपीएलमधील पहिल्या टप्प्याला मुकेल, असे बोललं जात होते. तो तंदुरूस्त झाल्यास एप्रिलच्या उत्तरार्धात पुनरागमनासाठी CSK चा संघ आशावादी होता. पण आता नव्याने झालेल्या दुखापतीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे चहरचे आयपीएलमध्ये पुनरागमन धोक्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्या टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असताना तो पूर्णपणे तंदुरूस्त असणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याला IPLमध्ये लगेच संघात सामील होण्याची संधी मिळणं फारच कठीण असल्याचे दिसत आहे.
Web Title: Big Blow to CSK again as Deepak Chahar Back injury puts further question mark over his IPL 2022 comeback
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.